PF Services : देशातील लाखो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच EPFO 3.0 सुरू करणार आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातून पैसे काढणे अत्यंत सोपे आणि जलद होणार आहे. पूर्वी पीएफमधून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरावा लागत होता आणि पैसे बँक खात्यात येण्याची वाट पाहावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक होती.
पण आता EPFO 3.0 अंतर्गत या सुविधा खूप सोप्या होणार आहेत. कर्मचारी आता थेट एटीएम कार्ड वापरून पैसे काढू शकतील किंवा यूपीआय ॲपद्वारे त्वरित आपल्या पीएफ खात्यातून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकतील.
नोकरी बदलताच पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर होईल
नोकरी बदलताना आतापर्यंत जुन्या पीएफ खात्यातून नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागत होता. ही प्रक्रियाही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होती. पण EPFO 3.0 मध्ये हे कामही आपोआप होईल. तुम्ही जेव्हा नवीन कंपनी जॉइन कराल, तेव्हा तुमचे पीएफ खाते आपोआप नवीन कंपनीच्या पीएफ खात्याशी जोडले जाईल. यामुळे, तुमच्या पैशांचे हस्तांतरण कोणत्याही त्रासाशिवाय लवकर पूर्ण होईल.
ॲप आणि वेबसाईट अधिक सोप्या होणार
ईपीएफओची वेबसाईट आणि मोबाईल ॲपमध्येही मोठे बदल केले जातील, ज्यामुळे त्यांचा वापर करणे आणखी सोपे होईल. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासू शकाल, क्लेमची स्थिती पाहू शकाल आणि इतर सुविधांचा वापरही सहज करू शकाल. म्हणजेच, तंत्रज्ञान इतके सोपे केले जाईल की कोणीही आपल्या पीएफशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळवू शकेल.
वाचा - उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
पेन्शन सेवांमध्येही सुधारणा
EPFO 3.0 केवळ पीएफमधून पैसे काढण्यापुरतेच मर्यादित नाही, तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन सेवेलाही अधिक डिजिटल आणि पारदर्शक बनवण्याची योजना आहे. यामुळे पेन्शनशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन आणि सहज होतील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होईल आणि ते लवकर त्यांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतील. आतापर्यंत आधार कार्ड जोडणे किंवा केवायसी पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणीही कमी होतील, कारण डिजिटल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तसेच, पीएफ बॅलन्सही बँक खात्याप्रमाणे रिअल-टाईम अपडेट होईल.