EPFO 3 features for PF members : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल, तर तुमच्यासाठी एक मोठा बदल लवकरच होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच ‘EPFO 3.0’ नावाचा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, ज्यामुळे ८ कोटींहून अधिक सदस्यांना थेट फायदा होईल. या प्लॅटफॉर्मद्वारे पीएफशी संबंधित अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत.
काय-काय बदलणार?
- सोपी क्लेम प्रक्रिया: आता क्लेम करण्यासाठी लांबलचक प्रक्रिया नाही, तर ओटीपी आधारित पडताळणी करून तुम्ही घरबसल्या क्लेम करू शकाल आणि त्याचा स्टेटसही ट्रॅक करू शकाल.
- वापरण्यास सोपा इंटरफेस: EPFO 3.0 चा इंटरफेस अतिशय वापरकर्ता-अनुकूल असेल, ज्यामुळे पीएफमधील शिल्लक, स्टेटमेंट आणि इतर माहिती सहजपणे उपलब्ध होईल.
- एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा: भविष्यात तुम्ही तुमचा पीएफ निधी एटीएमच्या माध्यमातून काढू शकाल. यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय असणे आवश्यक आहे.
- यूपीआय इंटीग्रेशन: ईपीएफओ आता यूपीआय एकत्रीकरणावर काम करत आहे, ज्यामुळे तुम्ही थेट यूपीआय ॲप्सद्वारे तुमचा पीएफ निधी हस्तांतरित करू शकाल.
- वेगवान आणि पारदर्शक प्रक्रिया: ईपीएफओचे उद्दिष्ट आहे की, क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावी, जेणेकरून सदस्यांना वेळेवर पैसे मिळतील.
प्रकल्पाला उशीर का होत आहे?
EPFO 3.0 लाँच होण्यास विलंब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे विश्वासार्ह आणि वापरण्यास सोपा बनवणे आहे. ही प्रणाली कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आयुष्याशी जोडलेली असल्यामुळे, यामध्ये कोणत्याही तांत्रिक त्रुटींना जागा ठेवलेली नाही. वापरकर्त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी चाचणी, फीडबॅक आणि सुधारणांची प्रक्रिया सतत सुरू आहे.
सध्या पीएफ काढण्याची प्रक्रिया काय आहे?
तुम्हाला सध्या तुमचा पीएफ काढायचा असल्यास, तुम्हाला सर्वप्रथम EPFO च्या वेबसाइटवर जावे लागते. तिथे UAN नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागते, त्यानंतर 'Online Services' मध्ये जाऊन क्लेम फॉर्म (Form 19, 10C किंवा 31) भरावा लागतो. आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी होते. एकदा क्लेम सबमिट झाल्यावर, तुम्ही त्याचा स्टेटस ऑनलाइन पाहू शकता. सध्याच्या नियमानुसार, तुमचा केवायसी पूर्ण आणि बँक तपशील योग्य असणे आवश्यक आहे, अन्यथा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
EPFO 3.0 आल्यानंतर यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळाल्याने पीएफ काढणे आणखी सोपे आणि जलद होईल.