Retirement Planning : निवृत्तीनंतर आरामाचे आयुष्य जगायचं असेल तर वेळीच आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय आहेत. पण, तुम्हाला सुरक्षिक आणि खात्रीशीर परतावा हवा असेल तर सरकारच्या लोकप्रिय ३ योजना आहेत. यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड यांचा समावेश होतो. या तिन्ही योजना सुरक्षित गुंतवणूक, स्थिर परतावा आणि कर लाभ देतात. परंतु, त्यांची पात्रता, योगदान प्रक्रिया आणि व्याजदर भिन्न आहेत. तुमच्या गरजा आणि नोकरीच्या स्वरूपानुसार कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
जनरल प्रॉव्हिडंट फंड
जनरल प्रॉव्हिडंट फंड ही एक सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. फक्त सरकारी कर्मचारी या योजनेत सहभागी होऊ शकतात. कर्मचारी त्यांच्या वेतनाचा एक निश्चित हिस्सा दर महिन्याला GPF खात्यात जमा करतात. यावर सरकारद्वारे निर्धारित व्याज मिळते. सध्याचा व्याजदर (१ ऑक्टोबर २०२४ पासून) ७.१% (वार्षिक) आहे. सेवेच्या समाप्तीनंतर किंवा निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला जमा रक्कम आणि व्याज दोन्ही एकत्रितपणे मिळते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही दीर्घ कालावधीसाठीची एक लोकप्रिय बचत योजना आहे, जी सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. नोकरदार, व्यावसायिक किंवा स्वयंरोजगार करणारे, प्रत्येक भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा मूळ कालावधी १५ वर्षांचा असतो, जो प्रत्येक ५ वर्षांनी वाढवता येतो. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी (तिमाही आधारावर) व्याजदर निश्चित करते. सध्याचा व्याजदर (१ ऑक्टोबर २०२४ पासून) ७.१% (वार्षिक) आहे. ही योजना सुरक्षित गुंतवणूक आणि आयकर सवलत प्रदान करते, ज्यामुळे ती सर्वात आकर्षक योजनांपैकी एक आहे.
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ही खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी असलेली योजना आहे. ज्या संस्थेत २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या संस्थेतील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही समान रकमेचे योगदान करतात. या फंडाचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे केले जाते. ईपीएफओ दरवर्षी यावर व्याजदर निश्चित करते. सध्याचा व्याजदर ८.२५% (वार्षिक) आहे. ही जमा रक्कम निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर काढता येते.
तिन्ही योजनांमधील मुख्य फरक
| निकष | जनरल प्रॉव्हिडंट फंड | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड | एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड |
| पात्रता | केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी | सर्व भारतीय नागरिकांसाठी | खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी |
| योगदान | फक्त कर्मचारी योगदान करतात | कोणताही भारतीय नागरिक योगदान करू शकतो. | कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही समान योगदान करतात |
| व्याजदर (सध्याचा) | | ७.१% (सरकारी निर्णय) | ७.१% (तिमाही समीक्षा) | ८.२५% (EPFO निश्चित करते) |
| टॅक्स बेनिफिट | उपलब्ध | उपलब्ध (EEE दर्जा) | उपलब्ध (EEE दर्जा) |
तुमच्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम?
जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी GPF हा एक अनिवार्य आणि सुरक्षित पर्याय आहे.
जर तुम्ही खासगी नोकरदार असाल तर तुमच्यासाठी EPF मध्ये योगदान करणे अनिवार्य आहे आणि तो सर्वाधिक व्याजदर देणारा सुरक्षित पर्याय आहे.
वाचा - टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
जर तुम्ही व्यावसायिक किंवा स्वयंरोजगार करणारे असाल किंवा अतिरिक्त सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर PPF हा १५ वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी सर्वोत्तम कर-बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे.
