EPFO : जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीत योगदान देत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि फायद्याची बातमी आहे. बहुतेक लोकांना माहिती आहे की ईपीएफ निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देतो, पण फार कमी लोकांना हे माहिती असते की, ईपीएफसोबत तुम्हाला मोफत जीवन विमा कवच देखील मिळते.
हे विमा कवच EDLI योजनेअंतर्गत दिले जाते. या योजनेनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला जास्तीत जास्त ७ लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही अतिरिक्त प्रीमियम भरावा लागत नाही.
काय आहे EDLI योजना?
कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला किमान २.५ लाख रुपये आणि जास्तीत जास्त ७ लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो.
यासाठी कर्मचाऱ्याला स्वतःच्या पगारातून योगदान द्यावे लागत नाही. नियोक्ता कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या ०.५% हिस्सा दर महिन्याला या योजनेत जमा करतो.
कोणाला मिळतो याचा फायदा?
- जी व्यक्ती EPF मध्ये योगदान देते, ती आपोआपच EDLI ची सदस्य बनून जाते.
- ही योजना स्थायी आणि कंत्राटी अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.
- आसाममधील चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू नाही.
योजनेचे फायदे आणि रक्कम मिळवण्याची प्रक्रिया
कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास, कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळतो. नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला विम्याची रक्कम (इन्शुरन्स अमाउंट) २० दिवसांच्या आत दिली जाते. यामुळे कुटुंबाला अचानक आलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळतो.
नियोक्ता योगदान न दिल्यास काय?
जर नियोक्त्याने वेळेवर EDLI मध्ये योगदान केले नाही, तर त्याच्यावर दरमहा १% दंड लावला जातो. आर्थिक अडचणी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित विशिष्ट परिस्थितीत बोर्ड हा दंड कमी करू शकतो किंवा माफ करू शकतो.
वाचा - तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
७ लाखांचा कमाल लाभ कसा मिळतो?
विम्याची कमाल रक्कम निश्चित करण्यासाठी मागील १२ महिन्यांचे PF बॅलन्स आणि कर्मचाऱ्याचा पगार विचारात घेतला जातो. म्हणजेच, कमाल लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या EPF खात्यात नियमित योगदान देणे महत्त्वाचे आहे. ईपीएफओकडून मिळणारा हा मोफत जीवन विमा आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मोठा आधार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यात नॉमिनीची नोंदणी केली आहे की नाही, हे त्वरित तपासा.
