शेअर बाजारात चढउतार होणे स्वाभाविक असते. बाजार जेव्हा बुलिश असतो तेव्हा त्यात नफा वसुली होणे साहजिक असते. अशा वेळेस बाजारात विक्री अधिक प्रमाणात होते. यास बाजारातील करेक्शन असे म्हणतात. बाजार जेव्हा वर जातो साहजिक त्यात उतारही असणारच. परंतु बाजार जेव्हा सातत्याने दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात वर जातो आणि त्यात मोठे करेक्शन येते तेव्हा मात्र गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण तयार होते. यालाच पॅनिक स्थिती असे म्हणतात. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक मूल्य घटल्याचे दिसल्याने अशी मनःस्थिती होणे स्वाभाविक असते. शेअर बाजार पडतो तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी बंद करता का? याचे उत्तर जर हो असेल तर गुंतवणूकदारांनी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. उद्देश : ज्या उद्देशाने म्युच्युअल फंड सुरु केला आहे तो बंद करू नका. शेअर बाजार जसा खाली येतो तसाच त्यास वरची दिशा निश्चित असते. गेल्या दहा-पंधरा वर्षांचा भारतीय शेअर बाजाराचा आलेख पहिला तर त्याची दिशा वरच्या बाजूनेच आहे. याचाच अर्थ दीर्घ कालावधीत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामालच केले आहे.
२. एनएव्ही : म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा रक्कम गुंतविली जाते त्या बदल्यात त्या म्युच्युअल फंडचे युनिट्स आपल्या खात्यात जमा केले जातात. हे युनिट्स त्या दिवशीच्या एनएव्हीवरून ठरविले जातात. उदा. रुपये दहा हजार गुंतविले आणि त्या दिवशीची एनएव्ही रुपये ५० /- असेल तर तुम्हाला एकूण २०० युनिट्स मिळतील. एनएव्हीचे मूल्य त्या म्युच्युअल फंड योजनेतील एकूण असेट मूल्यानुसार ठरते. म्हणजेच शेअर बाजार जेव्हा वर असतो आणि म्युच्युअल फंडमधील गुंतविलेले शेअर्स वधारले असतात तेव्हा एनएव्ही वाढलेली असते. याच उलट जेव्हा बाजार खाली असतो आणि शेअर्सचे भाव खाली येतात तेव्हा एनएव्ही कमी झालेली असते. यामुळे जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा कमी झालेल्या एनएव्ही मूल्यानुसार जास्त युनिट्स मिळतात.
३. म्युच्युअल फंड कालावधी : जितका कालावधी दीर्घ तितका फायदा अधिक. प्रत्येक महिन्यास जमा केलेली रक्कम आणि जमा युनिट्स याद्वारे आपल्या म्युच्युअल फंडची मालमत्ता ठरते. मागील दहा वर्षांचा निफ्टी किव्वा बीएसई इंडेक्स पहिला तर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. दहा वर्षांपूर्वी शेअर्सचे जे भाव होते त्यात मोठी वाढ झालेली दिसते. याचाच अर्थ म्युच्युअल फंडमधील जितके युनिट्स दहा वर्षांपूर्वी होते त्याचे मूल्य आजच्या वाढलेल्या एनएव्हीनुसार वाढल्याचे दिसते.
तीनही मुद्द्यावरून गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की शेअर बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा एसआयपी बंद करू नये. सुरु ठेवावी. याचा फायदा दीर्घ काळात निश्चित मिळतो.