Small cap Investment : गेल्या दोन वर्षांपासून गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या स्मॉलकॅप शेअर्ससाठी २०२५ हे वर्ष अत्यंत कठीण ठरले आहे. जिथे दिग्गज शेअर्सच्या बळावर सेन्सेक्सने ९.१ टक्क्यांची भरघोस वाढ नोंदवली, तिथे स्मॉलकॅप इंडेक्स मात्र ६.६ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा वर्षांतील स्मॉलकॅपची ही सर्वात निराशाजनक कामगिरी मानली जात आहे. मात्र, जाणकारांच्या मते ही घसरण म्हणजे पोर्टफोलिओमधील कचरा साफ करून चांगल्या कंपन्या निवडण्याची एक उत्तम संधी आहे.
जानेवारी २०२६ मध्येही घसरण सुरूच
स्मॉलकॅपमधील ही विक्री केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसून ती सर्वव्यापी आहे. आकडेवारीनुसार, इंडेक्समधील ७३% शेअर्स लाल निशाणीत बंद झाले. १,१९० शेअर्सपैकी ८७२ शेअर्समध्ये घसरण झाली असून, त्यापैकी ३२१ शेअर्सनी आपली ३० टक्क्यांहून अधिक व्हॅल्यू गमावली आहे. हा दबाव जानेवारी २०२६ मध्येही कायम असून, या महिन्यात इंडेक्स आधीच ९.१% खाली आला आहे.
दीर्घकालीन परतावा अजूनही सरस
अल्पकालीन घसरण झाली असली, तरी गेल्या १० वर्षांचा (२०१५-२०२५) इतिहास पाहिला तर स्मॉलकॅपचा CAGR परतावा १५.८% आहे, जो सेन्सेक्सच्या १२.६% परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. यामुळेच चांगल्या मूलभूत पाया असलेल्या कंपन्यांकडे गुंतवणूकदार पुन्हा वळत आहेत.
वाचा - श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड
कोणी मारली बाजी आणि कोणाची झाली पडझड?
तेजीत राहिलेले 'लकी' शेअर्स
- लुमॅक्स ऑटो टेक : ईव्ही सेक्टरमधील मोठ्या ऑर्डर्समुळे विक्री आणि नफ्यात मोठी वाढ.
- हिंदुस्थान कॉपर व MCX : तांब्याची जागतिक मागणी आणि वाढत्या ट्रेडिंग वॉल्यूममुळे हे शेअर्स चमकले.
- RBL बँक : २०२५ मध्ये या शेअरची किंमत दुप्पट झाली, मात्र सध्याच्या व्हॅल्युएशनवर विश्लेषक सावध आहेत.
गुंतवणूकदारांना निराश करणारे शेअर्स
- केईसी इंटरनॅशनल व टेक्नो इलेक्ट्रिक : महसूल वाढला तरी वाढत्या खर्चामुळे मार्जिनवर परिणाम झाला.
- बाटा इंडिया : जाहिरातींवरील खर्च आणि गोदामांच्या समस्यांमुळे नफ्याला कात्री लागली.
- नॅटको फार्मा : आता या कंपनीच्या भविष्यातील आशा अमेरिकेतील नवीन औषध लाँचवर अवलंबून आहेत.
