Financial Stability : प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या आर्थिक भविष्याची काळजी असते. मुलीच्या भविष्याला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी योग्य वेळी गुंतवणूक सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण, विवाह आणि इतर गरजांसाठी दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यासाठी पालकांसमोर अनेक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी योजना टॅक्समध्ये सूट आणि सुरक्षा देतात, तर मार्केट-आधारित गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजना
भारत सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत सुरू केलेली ही योजना मुलींसाठी सर्वात सुरक्षित आणि उच्च परतावा देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. या योजनेत ८.२० टक्के व्याजदर मिळतो. प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत सूट मिळते. यातून मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. किमान २५० रुपयांपासून खाते उघडता येते आणि ही योजना २१ वर्षांसाठी चालते (किंवा मुलीचे १८ वर्षांनंतर लग्न होईपर्यंत). शिक्षण आणि विवाहासाठी हा एक उत्कृष्ट दीर्घकालीन पर्याय आहे.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
पीपीएफ ही आणखी एक सुरक्षित सरकारी योजना आहे, जी दीर्घकाळ बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे. या योजनेत सध्या ७.१% व्याजदर मिळतो. कलम ८०C अंतर्गत टॅक्स सूट आणि मिळणारा परतावा टॅक्स-फ्री असतो. १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. परंतु, ६ वर्षांनंतर आंशिक रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन
हा प्लॅन विमा आणि बचत यांचे मिश्रण आहे. पालकाचे निधन झाल्यास, या योजना आर्थिक सुरक्षा पुरवतात. काही प्लॅनमध्ये प्रीमियम भरणे थांबवले जाते. परंतु, मुलीला ठरलेल्या वेळी संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम मिळते. कलम ८०C अंतर्गत टॅक्स सूट आणि अनेक प्लॅन मनी-बॅक पर्यायही देतात.
पोस्ट ऑफिस योजना
- जे पालक स्थिर आणि निश्चित परतावा शोधत आहेत, त्यांच्यासाठी पोस्टाच्या या योजना उपयुक्त आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत ७.७% व्याज दर मिळतो. ८०C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. याचा कालावधी ५ ते १० वर्षांचा असतो.
- मासिक उत्पन्न योजना : ६.६% व्याज दराने दरमहा उत्पन्न मिळते. याची मुदत ५ वर्षांची असते.
म्युच्युअल फंड आणि गोल्ड
- पालक जर थोडी जोखीम घेऊ शकत असतील, तर हे पर्याय जास्त परतावा देऊ शकतात.
- म्युच्युअल फंड : दीर्घकाळात महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवण्याची क्षमता असते. हे एसआयपीद्वारे केले जाऊ शकते.
- गोल्ड : सोन्याला पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, ज्याची किंमत कालांतराने वाढत जाते.
बचत ठेव आणि आवर्ती ठेव
फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट हे कमी जोखीम असलेले आणि स्थिर व्याज देणारे पर्याय आहेत. यावर साधारणपणे ६.५% ते ७.५% पर्यंत व्याज मिळते. ही लहान आणि मध्यम-मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी चांगला पर्याय आहे.
वाचा - डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
