RBI Rate Cut : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात नुकतीच ०.२५ टक्के कपात केली. त्यामुळे कर्जदार आनंदी असले तरी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आता गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिट्सच्या तुलनेत जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहेत. एफडीचे दर सातत्याने घसरत असल्याने, अनेक गुंतवणूकदार आता बॉन्ड मार्केटकडे आकर्षित होत आहेत. मात्र, हा बदल जितका सोपा वाटतो, तितका नाही. कारण बॉन्डमध्ये असे मोठे धोके आहेत, जे एफडीमध्ये नसतात.
बॉन्ड विरुद्ध एफडी ५ मोठे धोके
बॉन्ड मार्केटमध्ये एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असला तरी, यातील धोके जास्त आहेत, जे गुंतवणूकदारांना माहिती असणे आवश्यक आहे.
- सरकारी सिक्युरिटीजला सरकारी हमी मिळते, पण कॉर्पोरेट बॉन्ड पूर्णपणे जारी करणाऱ्या कंपनीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात. कंपनी बुडाल्यास पैसे बुडण्याची भीती असते.
- व्याजदर वाढल्यास बॉन्डची किंमत घटते, विशेषत: दीर्घकालीन बॉन्डमध्ये हा धोका खूप जास्त असतो.
- एफडी सहज तोडता येते, पण बॉन्ड मुदतीपूर्वी विकल्यास तुम्हाला योग्य किंमत मिळेलच याची खात्री नसते.
- एफडीमध्ये DICGC अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो, पण बॉन्डसाठी अशी कोणतीही सुरक्षा उपलब्ध नसते.
- बॉन्ड खरेदी करण्यासाठी साधारणपणे १ ते २ लाख रुपये लागतात, तर चांगले वैविध्य आणण्यासाठी कमीतकमी ५ लाख रुपयांची गुंतवणूक बॉन्डमध्ये आवश्यक मानली जाते.
सरकारी बॉन्ड विरुद्ध कॉर्पोरेट बॉन्ड : परतावा किती?
| गुंतवणुकीचा प्रकार | जोखीम पातळी | अंदाजित परतावा |
| सरकारी सिक्युरिटीज | कमी | ५.६% ते ६.७% |
| राज्य विकास कर्ज | सरकारी इतकाच सुरक्षित | ७% ते ७.५% (सरकारी पेक्षा जास्त) |
| AAA कॉर्पोरेट बॉन्ड | मध्यम ते जास्त | ७% ते ८.५% (क्रेडिट स्प्रेडमुळे जास्त) |
| BBB- कॉर्पोरेट बॉन्ड | अत्यंत जास्त | ९% ते १२% (डिफॉल्टचा धोका जास्त) |
लहान गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम पर्याय
बॉन्ड खरेदीसाठी मोठी रक्कम लागत असल्याने, लहान गुंतवणूकदारांसाठी डेट म्युच्युअल फंड्स हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. डेट फंड्समध्ये ५०० ते ५,००० रुपयांपासून एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करता येते. डेट फंड्समध्ये बाजारपेठेतील चढउतार आणि पुन्हा गुंतवणूक करण्याची चिंता फंड मॅनेजर सांभाळतात.
बॉन्डची निवड कधी करावी?
तज्ज्ञांच्या मते, दीर्घ कालावधीचे बॉन्ड व्याजदर कमी होत असताना अधिक फायदा देतात. मात्र, त्यांची किंमत अस्थिर असते. म्हणून, गुंतवणूकदारांनी केवळ एकाच प्रकारच्या बॉन्डवर अवलंबून न राहता, लॉन्ग आणि शॉर्ट ड्युरेशन बॉन्डचे मिश्रण ठेवणे अधिक सुरक्षित आणि संतुलित ठरते.
