Rs 55,000 crore withdrawn from provident fund | भविष्य निर्वाह निधीतून काढले 55 हजार कोटी रुपये

भविष्य निर्वाह निधीतून काढले 55 हजार कोटी रुपये

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाकाळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून आपली संचयित रक्कम काढून घेण्याकडे लोकांचा ओढा असल्याचे आढळून आले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ५५ हजार कोटी रुपये लोकांनी काढून घेतले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने केंद्रीय विश्वस्त मंडळाला पाठविलेल्या पत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे केली जाते. संस्था आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठरावीक रक्कम कापून भविष्य निर्वाह निधीत जमा करत असतात. आपत्कालीन परिस्थिती, मुलांचे शिक्षण, विवाह वा घर बांधणे इत्यादी अपवादात्मक स्थितीत भविष्य निर्वाह निधीतून ठरावीक प्रमाणात रक्कम काढण्यास अनुमती असते. मात्र, यंदा कोरोना कहरामुळे अनेकांचे रोजगार गेले वा त्यांच्या वेतनात कपात झाली. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडे तब्बल दीड कोटी लोकांनी पूर्ण वा अग्रीम 
रक्कम काढण्यासाठी दावे दाखल केले. त्यातून ५५ हजार ९०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. केंद्र सरकारने २७ मार्च रोजी भविष्य निर्वाह निधीतून ठरावीक रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जाहीर केले होते. २९ मार्च रोजी ही सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत ५५ हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून काढून घेतली.

अग्रीम दाव्यासाठी १२ हजार २०० कोटी रुपये
n दीड कोटी दाव्यांपैकी ४७ लाख ५८ हजार दावे अग्रीम रकमेचे होते. त्यातून १२ हजार २२० कोटी रुपये काढण्यात आले. निर्वाह निधी कायद्यातून सूट देण्यात आलेल्या संस्थांकडे (एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट्स) ३ लाख ८९ हजार १७८ कोविड-१९ अग्रीम दावे दाखल झाले. त्याद्वारे ३ हजार ७८२ कोटी रुपये सदस्यांना वितरित करण्यात आले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rs 55,000 crore withdrawn from provident fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.