Rohit Sharma Birthday: रोहित शर्मा आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'हिटमॅन' रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. रोहितनं आतापर्यंत ९ सामन्यात २४० धावा केल्यात. रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानावर चॅम्पियन तर आहेच, पण कमाईच्या बाबतीतही खूप पुढे आहे. रोहित शर्मा हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
रोहित शर्माने जून २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं आयर्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. सप्टेंबर २००७ मध्ये त्यानं टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दुसऱ्या सामन्यात रोहितनं पहिल्या डावात षटकारासह ५० धावांची खेळी केली.
कसोटी सामन्यात रोहितनं आतापर्यंत ६७ सामन्यात १२ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या मदतीनं ४३०१ धावा केल्यात. रोहितनं २७३ एकदिवसीय सामन्यात ३२ शतकांसह ११,१६८ धावा केल्या. १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना हिटमॅननं ४२३१ धावा केल्या. टी-२० विश्वचषक २०२४ चं विजेतेपद जिंकल्यानंतर रोहितनं आंतरराष्ट्रीय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो वनडे आणि कसोटीत टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसतो.
नेटवर्थ किती?
रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माची नेटवर्थ जवळपास २१४ कोटी रुपये आहे. क्रिकेटव्यतिरिक्त तो ब्रँड एंडोर्समेंट आणि त्यांच्या दोन अपार्टमेंट्सच्या भाड्यातूनही पैसे कमावतो. अपार्टमेंटच्या भाड्यातून त्याला दरमहा तीन लाख रुपये मिळतात. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये रोहित शर्माचा ग्रेड ए+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून वार्षिक सात कोटी रुपये मानधन मिळतं. याशिवाय वनडे, टेस्ट सामन्यांसाठीही तो खूप चांगली रक्कम घेतो.
रोहित ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावतो. रोहित ड्रीम-११, अडिडास, निसान, ओप्पो आणि ला लिगा सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करतो. रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटपटू एका एंडोर्समेंट डीलसाठी ५ ते ७ कोटी रुपये घेतात.
आलिशान लाइफस्टाइल
रोहित शर्मा सध्या आलिशान लाइफस्टाइल जगत आहे. त्याचं मुंबईत आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे, हे घर ६,००० स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेलं आहे. रोहितला लक्झरी गाड्यांची खूप आवड असून त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स ३, मर्सिडीज जीएलएस ४०० डी, टोयोटा फॉर्च्युनर अशा अनेक महागड्या कार्स आहेत.