Relianc Asian Paints: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) एशियन पेंट्समधील आपला ४.९ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला आता १७ वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचं आहे. पेंट क्षेत्रावर मार्जिनचा दबाव आणि वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागत असताना मुकेश अंबानी यांच्या कंपनीनं हा निर्णय घेतलाय. भारताचं पेंट मार्केट ९ अब्ज डॉलर्सचं आहे. या मार्केटमधील अनेक नवीन कंपन्या एशियन पेंट्सला नंबर १ च्या स्थानावरून हटवण्याचा प्रयत्नातदेखील आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्सनं हा करार करण्यासाठी बँक ऑफ अमेरिकाची (BOF) नियुक्ती केलीये. बीओएफए एक किंवा अनेक ब्लॉक डील्सद्वारे या व्यवहाराचं व्यवस्थापन करेल. मात्र, सध्याच्या बाजारभावापेक्षा ही ऑफर ६ ते ७ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या चोवीस तासांत अनेक गुंतवणूक बँका आणि ब्रोकर्सही खरेदीदारांच्या शोधात सहभागी झालेत. एशियन पेंट्सचा शेअर मंगळवारी २,३२३ रुपयांवर बंद झाला. या किमतीत रिलायन्सला ४.९ टक्के हिस्सा विकून ११,१४१ कोटी रुपये (१.३१ अब्ज डॉलर) मिळतील. एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये बुधवारी कामकाजादरम्यान घसरण दिसून आली.
किती केलेली गुंतवणूक?
गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी एशियन पेंट्सच्या शेअर्सनं ३,३९४ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. रिलायन्सनं जानेवारी २००८ मध्ये ५०० कोटी रुपयांना हा हिस्सा खरेदी केला होता. हा तो काळ होता जेव्हा जागतिक आर्थिक संकट येणार होतं. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये १९.३% घट झाली आहे. यामुळे कंपनीचं बाजारमूल्य सुमारे ५१,००० कोटी रुपयांनी कमी झालंय. एलारा सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष २५ मध्ये एशियन पेंट्सचा बाजार हिस्सा ५९% वरून ५२% पर्यंत घसरलाय. लाभांशासह, रिलायन्सला सध्याच्या बाजारभावानुसार गुंतवणुकीवर २४ पट परतावा मिळेल.
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं रिलायन्सनं दिली नाहीत. या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यांनुसार जर बोली इच्छित किमतीवर आल्या नाहीत तर कंपनी आपला प्लॅन रद्ददेखील करू शकते. बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की रिलायन्सनं पाच वर्षांपूर्वी देखील असाच पर्याय शोधला होता. हे अशा वेळी घडलं जेव्हा कंपनी भारतातील सर्वात मोठा राईट्स इश्यू लाँच करणार होती. परंतु कंपनीनं ती योजना पुढे नेली नाही.