Rekha Jhunjhunwala Shares: शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना शुक्रवारी मोठा नफा झाला. टाटा समूहातील दोन कंपन्यांचे शेअर्स वधारल्यानं त्यांना ८९२ कोटी रुपयांचा फायदा झालाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात विक्री सुरू असताना हा परतावा मिळाला आहे.
टाटा समूहाचे २ शेअर्स कोणते?
या यादीतील एका कंपनीचे नाव टायटन आहे. मार्च तिमाहीत कंपनीने चमकदार कामगिरी केलीये. तर दुसरी कंपनी टाटा मोटर्स आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा टाटा मोटर्सला फायदा झालाय. कारगिल युद्धाच्या वेळीही टाटा मोटर्सची कामगिरी नेत्रदीपक होती. तेव्हा कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ९२ टक्क्यांची वाढ दिसून आली.
टायटनच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
शुक्रवारी टायटनच्या शेअरमध्ये ४.९५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर्स ३५३० रुपयांच्या पातळीवर पोहोचले. कंपनीचं मार्केट कॅप ३.११ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलं. बाजार बंद होताना टायटनच्या शेअरची किंमत ३३६३.४५ रुपये होती. झुनझुनवाला यांच्या समभागांचे मूल्य शुक्रवारी १५,४०२.३० कोटी रुपयांवरून १६,१६५.०९ कोटी रुपयांवर पोहोचले. अवघ्या एका दिवसात त्यांच्या शेअर्सचे मूल्य ७६२.६९ कोटी रुपयांनी वाढले.
टायटनचा निव्वळ नफा ८७० कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल १३,४७७ कोटी रुपये झाला आहे.
टाटा मोटर्समध्ये तेजी
शुक्रवारी टाटा समूहाच्या कंपनीचा शेअर ३.९७ टक्क्यांनी वधारून ७०९ रुपयांवर पोहोचला. मात्र, शेअरचा भाव ६८१.९० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. रेखा झुनझुनवाला यांच्या या गुंतवणुकीचं मूल्य शुक्रवारी १२९.४५ कोटी रुपयांनी वाढलं. शुक्रवारी रेखा झुनझुनवाला यांना ८९२.१४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)