Ratan Tata News: दिवंगत दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर, त्यांच्या मृत्युपत्राबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता, सेशेल्समधील माहे बेटावरील सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील रतन टाटा यांच्या व्हिलाचं नाव समोर आलं आहे. सेशेल्समधील रतन टाटा यांचा सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील व्हिला विक्रीसाठी उपलब्ध आहे. परदेशी लोकांना सेशेल्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी नाही. परंतु, रतन टाटा यांना या नियमातून सूट देण्यात आली होती. एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन यांनी रतन टाटा यांना व्हिला खरेदी करण्यास मदत केली. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, शिवशंकरन आणि त्यांच्या कुटुंबानं आता रतन टाटा यांचा व्हिला खरेदी करण्यात रस दाखवला आहे. शिवशंकरन यांच्याकडे सेशेल्सचे नागरिकत्व आहे. जर व्हिला विकला गेला तर त्यातून मिळणारं उत्पन्न रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला जाईल.
रतन टाटांनी त्यांच्या मृत्युपत्रात सेशेल्समधील व्हिला त्यांच्या गुंतवणूक फर्म, आरएनटी असोसिएट्सला दिला होता, जी सिंगापूरमध्ये नोंदणीकृत आहे आणि अनेक उदयोन्मुख भारतीय स्टार्टअप्सना निधी पुरवते. व्यावसायिक थर्ट पार्टी एक्सपर्ट्सनं या व्हिलाचं मूल्यमापन केलंय आणि त्याची किंमत फक्त ₹८५ लाख असल्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन आणि त्यांचे कुटुंब किंवा सहकारी हे समुद्रकिनाऱ्यावरील व्हिला खरेदी करण्यात उत्सुकता दाखवत आहेत. त्यांना ते ६.२ मिलियन डॉलर्स किंवा अंदाजे ५५ कोटी रुपयांना खरेदी करायचं आहे.
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
अजून डील झालेली नाही
परंतु, रतन टाटांचा व्हिला खरेदी करण्याबद्दल विचारलं असता, शिवशंकरन म्हणाले, "तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही." त्यांच्या नकारावरून असे दिसून येतं की चर्चा सुरू असताना, अद्याप कोणताही करार अंतिम झालेला नाही. सेशेल्सचे नागरिक असलेल्या शिवशंकरन यांनी रतन टाटांना मालमत्ता खरेदी करण्यास मदत केली होती. सेशेल्स कायद्यानुसार, फक्त नागरिकच तेथे मालमत्ता खरेदी करू शकतात. रतन टाटा हे सेशेल्सचे नागरिक नसल्यामुळे, त्यांना विशेष सूट देण्यात आली होती कारण ते एक जागतिक उद्योगपती आणि परोपकारी व्यक्ती होते. शिवशंकरन यांनी टाटांच्या टेलिकॉम कंपनीतही गुंतवणूक केली होती.
१९८२ मध्ये, सेशेल्सने टाटा मोटर्सच्या वाहतुकीतील योगदानाची दखल घेत एक स्मारक टपाल तिकिट जारी केलं. २००४ नंतर काही काळासाठी, इंडियन हॉटेल्सन (ताज) सेशेल्समधील डेनिस आयलंड मालमत्तेचे व्यवस्थापन देखील केलं.
शिवशंकरन हे रतन टाटांचे नीकटवर्तीय
सी. शिवशंकरन आणि रतन टाटा यांचे खूप खास नातं होतं. शिवशंकरन सांगतात की सलग सात वर्षे ते दररोज सकाळी ७:१५ वाजता मुंबईतील रतन टाटांच्या बख्तावर अपार्टमेंटमध्ये येत असत. ते सुमारे ४५ मिनिटे एकत्र घालवत असत. बऱ्याचदा, जेव्हा ते येत असत तेव्हा त्यांना रतन टाटा मीटिंगदरम्यान वर्कआऊट करताना दिसत होते. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हे केले.
एक घटना आठवत शिवशंकरन आठवतात की सिंगापूरहून सेशेल्सला जाणाऱ्या विमानात इंजिन बिघाड झाला. प्रवाशांना विमान अपघाताची शक्यताही सांगण्यात आली होती. शिवशंकरन घाबरले आणि त्यांनी त्यांचा जीमेल पासवर्ड त्यांच्या मुलाला पाठवला. पण रतन टाटा शांतपणे म्हणाले, "वैमानिकांना त्यांचं काम करू द्या."
