lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या 'आत्मनिर्भर भारत अभियान'चा अर्थ काय?... सांगताहेत अर्थतज्ज्ञ  

पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या 'आत्मनिर्भर भारत अभियान'चा अर्थ काय?... सांगताहेत अर्थतज्ज्ञ  

आज केवळ आपणच एक देश म्हणून स्वदेशीकडे वळतो आहोत, असे नाही तर अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कोरिया आणि अगदी स्वत: चीन दुसरे काय करत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:07 PM2020-06-06T17:07:30+5:302020-06-06T17:36:52+5:30

आज केवळ आपणच एक देश म्हणून स्वदेशीकडे वळतो आहोत, असे नाही तर अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कोरिया आणि अगदी स्वत: चीन दुसरे काय करत आहेत?

PM Narendra Modi 'Atmanirbhar Bharat Abhiyan'?; major points by economic expert | पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या 'आत्मनिर्भर भारत अभियान'चा अर्थ काय?... सांगताहेत अर्थतज्ज्ञ  

पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या 'आत्मनिर्भर भारत अभियान'चा अर्थ काय?... सांगताहेत अर्थतज्ज्ञ  

Highlightsभारतीय राजकारणात व राजकीय अर्थकारणात ‘स्वदेशी’ या शब्दाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्यांनी केला.एक मोदी जाकीट हा प्रकार आज वर्षाला काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतो.पुढच्या पाच वर्षांत आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था अगदी ४.५ ते पाच टक्के दराने वाढली, तरी २० लाख कोटी रुपयांची भरपाई करणे फारसे कठीण नाही.

>> चन्द्रशेखर टिळक

पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून आत्मनिर्भरतेचा संदेश देणारे जे भाषण दिले, त्यानंतर काही विचार मनात आले.

१. या भाषणात जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ‘आत्मनिर्भर भारत’ हा शब्द उच्चारला, तेव्हा मला एकदम अरुणा ढेरे यांच्या ‘मैत्रेयी’ कादंबरीची आठवण आली. त्या कादंबरीच्या शेवटी येणाऱ्या एका प्रसंगात मैत्रेयी याज्ञवल्क्य ऋषी यांच्याकडे अशी मागणी करते की, ‘तुम्ही जर काही मला देणार असाल, तर तुमच्यात असणारी मी मला परत द्या. माझे आत्मभान मला परत द्या.’ सध्याच्या परिस्थितीत आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था पंतप्रधानांच्या मुखातून किंवा द्वारे असंच काहीतरी मागत होती का?

२. त्या संबोधनाचा पहिला भाग काहींना अनावश्यक वाटत होता. अगदी त्याच्यापेक्षाही काही पलीकडचे काहींना वाटत असल्याचे माननीय पंतप्रधानांचे भाषण पूर्ण होण्याआधीच सोशल मीडियावर झळकू लागलेल्या पोस्टवरून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.

मला तेव्हा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात जशी फलंदाजी करतात, त्याची निष्कारण आठवण येत होती. ते दोघे कसे आधी अगदी अंत बघितला जाईल, इतकी धीमी फलंदाजी करतात. वेळप्रसंगी आवश्यक धावगती अशक्य वाटावी, अशा पातळीवर जाऊ देतात आणि मग अचानक ते दोघं गिअर बदलतात. क्रिकेट सामना त्यातून उत्कंठावर्धक होतो आणि मग शेवटच्या षटकात किंवा चेंडूवर षटकार... त्या दिवशी थोडेफार तसे काहीतरी चालले होते का... तो शेवटच्या चेंडूवर षटकार बसला आहे की नाही, हे मात्र आताच सांगता येणार नाही.

३. त्या दिवशीच्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख झाला, त्या महत्त्वाच्या आहेतच! पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, ते ज्याचा प्रत्यक्षात भाषणात उल्लेख केला नाही, पण त्याबाबत कोणतीही संदिग्धता शिल्लक ठेवली नाही, अशा काही गोष्टी भाषणाचे खरे वैशिष्ट्य आहे.

यातली पहिली गोष्ट म्हणजे ‘स्वदेशी’. संपूर्ण भाषणात स्वदेशी या शब्दाचा एकदाही उल्लेख नाही. पण Be vocal about being local म्हणजे दुसरे काय? यात राजकीय संतुलन किती आणि परिवारात्मक ताणतणाव किती, हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी हे संपूर्ण भाषण हे Strategic Draftin चे अस्खलित उदाहरण आहे.

अजून एक... कदाचित, तो माझ्या आडनावाचा दोष असावा, पण हा मुद्दा मांडला जात असताना मला एक भाबडी आशा होती की, माननीय पंतप्रधान एकदा तरी लोकमान्य टिळकांचा उल्लेख करतील. कारण, भारतीय राजकारणात व राजकीय अर्थकारणात ‘स्वदेशी’ या शब्दाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्यांनी केला. तोही १९०५ साली. नुसता उल्लेख केला असं नाही, तर तो सातत्याने कार्यान्वित केला आणि ठेवलाही!

लोकमान्य टिळक यांचा नावानिशी उल्लेख करतील, अशा भाबड्या आशेचे अजून एक कारण म्हणजे स्वदेशीला कार्यान्वित करताना आणि त्याची राष्ट्रीय उद्दिष्टांशी सांगड घालताना आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण यांचा चपखल उपयोग करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक.

आज केवळ आपणच एक देश म्हणून स्वदेशीकडे वळतो आहोत, असे नाही तर अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कोरिया आणि अगदी स्वत: चीन दुसरे काय करत आहेत? शिवाय, तसंही सध्या लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू आहे. पण, तसा उल्लेख झाला नाही.

४. ज्याचा उल्लेख नाही, पण या भाषणाची संपूर्ण पार्श्वभूमी असणारा असाच दुसरा शब्द म्हणजे ‘चीन’. केवळ चीनमध्ये आणि चीनमुळे कोरोना सुरू झाला आणि सुरू राहिला, इतका पुरेसाच तो संदर्भ मर्यादित नाही, हे निश्चितच!

त्यानंतरही चीनने आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आणि राजकारणात ज्या खेळ्या सुरू ठेवल्या आहेत आणि सुरू केल्या आहेत, त्याबद्दलचं धोरणात्मक असं पाऊल म्हणूनही पंतप्रधान मोदींच्या या भाषणाकडे पाहावे लागेल.

५. ज्या गोष्टींचा उल्लेख माननीय पंतप्रधानांच्या भाषणात स्पष्टपणे केला गेला आहे, त्याच्याकडे वळताना ‘खादी आणि हॅण्डलूम’ हा विषय. गेली जवळजवळ दीड-दोन दशके माझ्या व्यावसायिक वेळापत्रकाचे स्वरूप असे आहे की, महिन्यातले १७-१८ दिवस मी फिरतीवर असतो, महाराष्ट्रात आणि आपल्या देशातल्या इतर राज्यांतही. त्यामुळे स्वानुभवाने सांगू शकतो की, या उद्योगांनी गेल्या सहा वर्षांत कमालीची कात टाकली आहे.

एक मोदी जाकीट हा प्रकार आज वर्षाला काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतो, कारण गल्लीबोळांपासून ते कॉर्पोरेट बोर्डरूमपर्यंत वस्त्रप्रावरणाचा हा प्रकार ‘एकाचवेळी कॅज्युअल आणि त्याचवेळी फॉरमल म्हणूनही’ प्रचलित झाला आहे. अगदी १०० रुपयांपासून कित्येक हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या प्रकाराने कोट-ब्लेझर-सूट हे प्रकार भारतीय बोर्डरूममधून हळूहळू बरखास्त करायला सुरुवात केली आहे.

६. हे सगळे विचार करत असताना असाही विचार मनात तरळून गेला की, निर्यात आकर्षक करण्यासाठी आणि आयात महाग करण्यासाठी आपल्या रुपयाचे अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन) करण्याची घोषणा तर होणार नाही ना?

७. पंतप्रधान काय किंवा अर्थमंत्री काय, अशी मोठी घोषणा करताना पद म्हणा, व्यक्ती म्हणा म्हणून पुढाकार जरूर असतो; पण ती एक प्रक्रिया असते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम घोषित करताना सरकारी पातळीवर नक्कीच विचार झाला असणार. याआधी जाहीर झालेल्या काही योजना या पॅकेजचा भाग असतील का?

असा विचार करत असताना मग हळूहळू लक्षात येते की, पुढच्या पाच वर्षांत आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था अगदी ४.५ ते पाच टक्के दराने वाढली, तरी २० लाख कोटी रुपयांची भरपाई करणे फारसे कठीण नाही.

८. पंतप्रधानांच्या त्या भाषणातले सगळ्यात जास्त महत्त्वाचे (माझ्या मते) विधान म्हणजे Not the incremental; but the quantum jump in economy. हे विधान केवळ आकर्षक किंवा आक्रमक नाही, तर आश्वासक आहे. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत तर नक्कीच! त्यासाठी इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, डेमोग्राफी आणि डिमांड या पाच गोष्टींवर प्रामुख्याने आधारित असे हे पॅकेज असेल, असं सांगत असतानाच त्याची भिस्त सप्लाय चेन्सवर असेल, असं जेव्हा माननीय पंतप्रधान म्हणतात, तेव्हा आशेची अनेक किरणं दिसू लागतात. कारण, कृषी उत्पादनापासून वीज व पाण्यापर्यंत आणि शिक्षणापासून राजकारणापर्यंत आपल्या देशात उत्पादन ही समस्या नसून वितरण हा जटिल प्रश्न आहे. (कोरोनाचा संसर्ग हा अशा वितरणव्यवस्थेतील वेगळ्याच प्रकारची समस्या अधोरेखित करतो.)

९. असं सगळं ऐकत असताना मनामध्ये एक येत राहते की, माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजावे आणि निदान त्याबाबत तरी आत्मनिर्भर व्हावे म्हणून यापुढे वेळोवेळी सरकार नागरिकांना हे २० लाख कोटी रुपये कसे आणि कधी दिले गेले, हे वारंवार स्पष्ट करत राहील ना!

१०. एकंदरीत काय, आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे या लॉकडाउनच्या काळात सवय लागल्याप्रमाणे आपण आणि आपल्या राहत्या वस्तीतला वाणी, आपल्या वस्तीतला दूधवाला- भाजीवाला- इस्त्रीवाला- फळवाला... उल्लेख न करता मल्टीब्रॅण्ड रिटेलची ऐशी-तैशी...
अशा अनेक गोष्टी स्वत:ला विचारत राहावे लागेल. त्याची उत्तरे शोधावी लागतील.

मला ‘आत्मनिर्भर भारत अभियान’चा अर्थ समजून घेताना श्री.म. माटे यांच्या ‘देश म्हणजे देशातली माणसे’ याचीच सारखी आठवण होत होती. आपण नागरिक म्हणून आत्मनिर्भर, तर आपला देशही आत्मनिर्भर!

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)

(संकलन : स्नेहा पावसकर)

Web Title: PM Narendra Modi 'Atmanirbhar Bharat Abhiyan'?; major points by economic expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.