Parle, who fears Worker cut's due to the recession, earned record-breaking profits | मंदीमुळे कामगार कपातीची भीती व्यक्त करणाऱ्या पार्लेने कमावला रेकॉर्डब्रेक नफा 
मंदीमुळे कामगार कपातीची भीती व्यक्त करणाऱ्या पार्लेने कमावला रेकॉर्डब्रेक नफा 

नवी दिल्ली - देशात असलेल्या आर्थिक मंदीच्या वातावरणामुळे कंपनीमधील सुमारे 10 हजार कामगारांची कपात करण्याची शक्यता वर्तवणाऱ्या पार्ले कंपनीच्या उत्पन्नाबाबत मोठी बातमी आली आहे. आर्थिक सुस्तीमुळे कामगार कपातीची भीती व्यक्त करणाऱ्या पार्ले कंपनीच्या 2018-19 या आर्थिक वर्षांतील निव्वळ नफ्यात 15.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पार्ले कंपनीने कमावलेल्या नफ्याच्या शक्यतेचे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. काही दिवसांपूर्वी लोकांकडे पार्लेजीचे पाच रुपये किमतीचे बिस्किट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते असे सांगण्यात येत होते, तीच कंपनी आता नफा कमवत आहेत, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे. 

 पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपच्या पार्ले बिस्किट्स विभागाचा 2018-19 या आर्थिक वर्षातील निव्वळ नफा 15.2 टक्क्क्यांनी वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच या बिस्किट निर्मात्यांनी आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवून जीएसटीमधून सूट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पार्ले कंपनीने कमावलेला नफा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. टॉफ्लर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार 2017-18 मध्ये पार्ले बिस्कीट्स कंपनीचा निव्वळ नफा 355 रुपये होता, तो 2018-19 या आर्थिक वर्षांत वाढून 410 कोटी झाला आहे. त्याबरोबरच कंपनीचे एकूण उत्पन्न आधीच्या आर्थिक वर्षापेक्षा 6.4 टक्क्यांनी वाढून 9 हजार 030 कोटी रुपये झाले आहे. 

 दरम्यान, पार्ले कंपनीने नफा कमावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वी आघाडीचे अर्थशास्त्रज्ञ सांगत होते की लोकांकडे पाच रुपये किमतीचे पार्लेजी बिस्कीट खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. पण त्याच कंपनीने आता 15.2 टक्के नफा कमावला आहे. तसेच कंपनीचे उत्पन्नही 6.4 टक्क्यांनी वाढून 9 हजार 030 कोटी रुपये झाले आहे. 

 देशात आर्थिक मंदीचे सावट दिसत असतानाच सरकारने जीएसटीत सवलत दिली नाही तर आपल्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 हजार कामगारांना कामावरून कमी करावे लागेल, अशी भीती पार्ले कंपनीने व्यक्त केली होती. 


Web Title: Parle, who fears Worker cut's due to the recession, earned record-breaking profits
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.