Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत चालली आहे. यातून भारतीय शेअर बाजारही सुटला नाही. आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशीही शेअर बाजारात सलग घसरण सुरूच राहिली. गुरुवारी, निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही आज कमकुवतपणा दिसून आला.
कोणत्या क्षेत्रांवर दबाव?
क्षेत्रीय आघाडीवर पाहिल्यास, संरक्षण, बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. याउलट, रिअल्टी आणि धातूंनी मात्र वाढ नोंदवली.
सुरुवातीला बाजारात थोडी वाढ दिसली असली, तरी निफ्टी २५,४०० च्या खाली घसरला आणि त्याच पातळीच्या खाली बंद झाला. व्यापक बाजार देखील लाल रंगात बंद झाला. परंतु, दिवसाच्या नीचांकी पातळीपेक्षा काही प्रमाणात सुधारणा दिसून आली.
आज बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ३४६ अंकांनी घसरून ८३,१९० वर बंद झाला. तर निफ्टी १२१ अंकांनी घसरून २५,३५५ वर थांबला. निफ्टी बँकेत २५८ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक ५६,९५६ वर बंद पोहचला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक १८० अंकांच्या घसरणीसह ५९,१६० वर स्थिरावला.
आजच्या बाजारातील महत्त्वाचे शेअर्स
- कमकुवत कामगिरी: निफ्टीमधील ५० पैकी ४० शेअर्स आज लाल रंगात बंद झाले. भारती एअरटेल हा निफ्टीतील सर्वात कमकुवत शेअर होता.
- विमा कंपन्या: जून महिन्याच्या आकडेवारीच्या प्रकाशनानंतर एचडीएफसी लाईफ घसरणीसह बंद झाला, तर मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसने वाढ दर्शविली.
- आयटी शेअर्स: टीसीएस आणि टाटा एलेक्सीच्या निकालांपूर्वी आयटी शेअर्समध्ये घसरण झाली.
- एशियन पेंट्स : अक्झो नोबेल इंडियामधील ४.४२% हिस्सा विकण्याच्या वृत्तानंतर एशियन पेंट्सचा शेअर २% ने घसरून बंद झाला.
- तेजीतील शेअर्स: निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या समभागांच्या यादीत इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकी यांची नावे होती, ज्यात १.५% पर्यंत वाढ झाली.
- संरक्षण क्षेत्रातील नफा बुकिंग: संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये नफा बुकिंग झाली आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड ५% तर सोलर इंडस्ट्रीज ३% घसरून बंद झाले.
- बीएसई : बाजारातील कमी वॉल्यूममुळे बीएसईमध्येही कमकुवतपणा कायम राहिला आणि हे समभाग २% घसरून बंद झाले.
- एलआयसी : सरकार कंपनीच्या काही भागाची विक्री ओएफएसद्वारे करण्यास मान्यता देणार असल्याच्या वृत्तानंतर एलआयसीमध्येही २% घसरण झाली.
- ग्लेनमार्क आणि पेटीएम : यूएस एफडीएकडून मंजुरी मिळाल्यानंतरही ग्लेनमार्क ५% घसरून बंद झाला. जून तिमाहीच्या अपडेटपूर्वी पेटीएम कमकुवत राहिला आणि आज ४% घसरून बंद झाला.
- पीएफसी आणि आरईसी : मॉर्गन स्टॅनलीच्या सकारात्मक अहवालानंतर हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.
वाचा - तुम्हालाही पोस्टात जायचा कंटाळा येतो? आता आधारने घरबसल्या उघडा PPF, RD खाते!
- आयआरईडीए आणि प्रेस्टिज इस्टेट्स : कॅपिटल गेन बाँडसाठी सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आयआरईडीए २% वाढीसह बंद झाले, तर प्रेस्टिज इस्टेट्समध्ये ३% वाढ झाली.