Zepto IPO: क्विक-कॉमर्स क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी झेप्टोनं आपल्या कॉर्पोरेट संरचनेत महत्त्वपूर्ण बदल करत प्रायव्हेट लिमिटेड मधून पब्लिक लिमिटेडमध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भागधारकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्यानंतर कंपनीचे नाव झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड वरून झेप्टो लिमिटेड होईल.
झेप्टोची मजबूत वाढ आणि बाजारपेठेतील वाढती पकड लक्षात घेऊन हे पाऊल उचललं जात आहे. नियामक दाखलानुसार २०२६ मध्ये आयपीओद्वारे लिस्टिंग करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी गोल्डमॅन सॅक्स, मॉर्गन स्टॅनले आणि जेएम फायनान्शियल सारख्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकांना मर्चंट बँकर म्हणून निवडलं गेलं आहे. आयपीओद्वारे झेप्टो सुमारे ४,५०० कोटी रुपये उभे करण्याची शक्यता आहे.
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
आयपीओच्या तयारीला गती
झेप्टो गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक कंपनी बनण्याच्या तयारीत होती. मर्चंट बँकर्सची निवड झाल्यानंतर लगेचच कंपनीनं आपला मुख्य ऑपरेशनल बेस सिंगापूरहून परत भारतात हलवला. कंपनीची मूळ योजना २०२५ मध्ये लिस्ट होण्याची होती, परंतु नंतर ती २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. याचदरम्यान झेप्टोने ७ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनावर ४५ कोटी डॉलर उभे केले. कंपनी लवकरच सेबीकडे आयपीओचा ड्राफ्ट पेपर सादर करेल. २०२१ मध्ये सुरू झालेल्या झेप्टोनं आतापर्यंत १.८ अब्ज डॉलरची फंडिंग मिळवलं आहे आणि सप्टेंबर २०२५ पर्यंत तिचे देशभरात ९०० हून अधिक डार्क स्टोअर्स कार्यरत आहेत.
क्विक-कॉमर्समध्ये तीव्र स्पर्धा
झेप्टोची मुख्य स्पर्धा स्विगीचा इन्स्टामार्ट, ब्लिंकिट यांच्याशी आहे. या क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. कंपन्या सातत्याने फंड जमा करत आहेत, जे या उद्योगात कॅश बर्नची मोठी समस्या दर्शवत आहे. स्विगी नोव्हेंबर २०२४ मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. तिचा ११,३२७.४३ कोटी रुपयांचा आयपीओ ३.५९ पट सबस्क्राइब झाला होता आणि नंतर तिने क्यूआयपीद्वारे १०,००० कोटी रुपये उभे केले. तर इटर्नल (झोमॅटो) जुलै २०२१ मध्ये लिस्ट झाली होती, तिचा आयपीओ ९,३७५ कोटी रुपयांचा होता आणि तो ३८.२५ पट सबस्क्राइब झाला होता. त्यानंतर तिने क्यूआयपीतून ८,००० कोटी रुपये उभे केले. या स्पर्धेच्या काळात झेप्टोचं मूल्यांकन सुमारे ७ अब्ज डॉलर सांगितलं जातं, ज्यामुळे ती क्विक-कॉमर्स बाजारात एक प्रमुख खेळाडू म्हणून कायम आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
