Top 10 Powerful Countries : जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत भारताचा दबदबा वाढत असल्याचा दावा केला जात असतानाच, 'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू'ने जाहीर केलेल्या २०२६ च्या १० सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर फेकला गेला आहे. या यादीत भारताला चक्क १२ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आणि चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद असलेल्या भारतासाठी हे मानांकन आश्चर्यकारक मानले जात आहे.
१० महासत्तांची यादी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. चीन आणि रशियाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.
१. संयुक्त राज्य अमेरिका
२. चीन
३. रशिया
४. युनायटेड किंगडम
५. जर्मनी
६. दक्षिण कोरिया
७. फ्रान्स
८. जपान
९. सौदी अरेबिया
१०. इस्रायल
भारत १२ व्या क्रमांकावर का?
जगातील सर्वाधिक लोकसंख्या आणि अण्वस्त्र सज्ज देश असूनही भारताला पहिल्या १० मध्ये स्थान न मिळाल्याने तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने हे रँकिंग ठरवण्यासाठी खालील ५ निकषांचा वापर केला आहे.
- राजकीय आणि आर्थिक प्रभाव : जागतिक व्यापार आणि राजकारणात त्या देशाचा शब्द किती पाळला जातो.
- लष्करी युती : नाटो सारख्या आंतरराष्ट्रीय लष्करी आघाड्यांमधील सहभाग.
- तंत्रज्ञान प्रगती : एआय आणि प्रगत तंत्रज्ञानातील संशोधनाचा स्तर.
- प्रशासकीय स्थिरता : देशांतर्गत शासन व्यवस्था किती स्थिर आहे.
- आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा : जागतिक मंचावर त्या देशाची ओळख आणि नेतृत्व करण्याची क्षमता.
'ताकद' मोजणे का आहे कठीण?
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, "जगातील सर्वात शक्तिशाली देश ठरवणे हे केवळ आकडेवारीवर अवलंबून नसते. यात लष्करी ताकदीसोबतच आर्थिक दबदबा, राजकीय प्रभाव आणि 'सांस्कृतिक प्रभाव' यांचाही मोठा वाटा असतो." अमेरिकेतील 'पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटी'च्या व्हार्टन स्कूल आणि 'BAV Group' च्या जागतिक सर्वेक्षणाच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली आहे.
वाचा - २.८५ लाख रुपये पगार, ७५ लाखांचं कर्ज आणि २ कोटी रुपयांचं नुकसान; F&O ट्रेडिंगची 'त्याची' भयानक कहाणी
भारतासाठी हा इशारा की संधी?
आर्थिक आघाडीवर भारत जर्मनीला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तरीही 'आंतरराष्ट्रीय संस्थांमधील प्रभावी सहभाग' आणि 'प्रति दरडोई उत्पन्न' यांसारख्या तांत्रिक मुद्द्यांमुळे भारताचे रँकिंग घसरल्याचे बोलले जात आहे. मात्र, दक्षिण कोरिया, जपान आणि इस्रायलसारख्या छोट्या पण तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशांनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळवून भारताला मोठी स्पर्धा दिली आहे.
