Work-Life Balance Goal : गेल्या काही वर्षांपासून काम आणि जीवनाचे संतुलन हा मुद्दा देशात चर्चेत आहे. गेल्या वर्षी इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी तरुणांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. दरम्यान, राजधानी दिल्लीतील एका कंपनीने याच पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलंय. कंपनीच्या निर्णयानंतर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याचा सण. कर्मचाऱ्यांच्या याच भावनांचा आदर करत दिल्लीतील एका पब्लिक रिलेशन एजन्सीने यंदाच्या दिवाळीला एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. 'एलीट मार्क' या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ९ दिवसांची पूर्ण सुट्टी जाहीर केली आहे, ज्यामुळे त्यांना कामाच्या तणावाशिवाय सणाचा आनंद घेता येईल.
हा निर्णय १८ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी लागू असणार आहे.
सीईओंचे मजेदार आणि भावनिक पत्र व्हायरल..
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोवर यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, "या दिवाळीत कामातून पूर्णपणे ब्रेक घ्या, रात्री उशिरापर्यंत हसा, भरपूर मिठाई खा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ईमेल तेव्हाच उघडा, जेव्हा तो Amazon, Swiggy किंवा Zomato कडून आला असेल."
दोन किलो वजन वाढवून या!
रजत ग्रोवर यांनी ब्रेकचा योग्य वापर कसा करायचा, याबद्दलही मजेदार सूचना दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, "या सुट्टीत कुटुंबासोबतच्या 'ड्रामा'चे एपिसोड्स पाहा, काजू कतली खाण्याचा आपला जुना रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करा आणि दुपारपर्यंत झोपण्याची कला आत्मसात करा."
शेवटी त्यांनी एक प्रेमळ संदेश दिलाय, ते म्हणाले मनमुराद हसा, फटाके जबाबदारीने उडवा आणि या सणाचा मनसोक्त आनंद घ्या. जेव्हा परत याल, तेव्हा दोन किलो वजन वाढवून आणि दहापट अधिक आनंदी होऊन परत या."
वाचा - दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
उत्कृष्ट 'वर्क कल्चर'चे उदाहरण
एका कर्मचाऱ्याने हे पत्र 'लिंक्डइन' वर शेअर केल्यानंतर ते त्वरित व्हायरल झाले. नेटकरी 'एलीट मार्क'च्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. जेव्हा अनेक कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढवण्यावरून आणि ऑफिसला परत बोलावण्याच्या नियमांवरून वाद सुरू आहेत, अशा वेळी 'एलीट मार्क'ने कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला महत्त्व देत उचललेले हे पाऊल उत्कृष्ट कार्य संस्कृतीचे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.