N Chandrasekaran Third Term: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना तिसरी टर्म मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'ईटी'च्या वृत्तानुसार, टाटा सन्स पुढील आठवड्यात एका विशेष सर्वसाधारण सभेची तयारी करत असून, त्यामध्ये चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, चंद्रशेखरन यांचा दुसरा कार्यकाळ संपायला अजून पूर्ण एक वर्ष बाकी आहे. हा प्रस्ताव टाटा सन्सच्या निवृत्ती धोरणातील एक अपवाद ठरेल. याआधी २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांच्यानंतर रतन टाटा जेव्हा अध्यक्ष झाले होते, तेव्हा त्यांना अशी सवलत देण्यात आली होती. चंद्रशेखरन येत्या जूनमध्ये ६३ वर्षांचे होतील, त्यामुळे हा प्रस्ताव टाटा सन्सच्या ६५ वर्षांवरील नॉन-एग्झिक्युटिव्ह रोलसाठी असलेल्या निवृत्ती धोरणातील एक विशेष सवलत मानली जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एआय तंत्रज्ञानाचं आव्हान
टाटा सन्सचे मुख्य भागधारक असलेल्या 'टाटा ट्रस्ट्स'नं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला हिरवा कंदील दाखवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएसचे वरिष्ठ व्यवस्थापन पुढील आठवड्यात टाटा सन्सच्या बोर्डासमोर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर (AI) सादरीकरण करणार आहे. अलीकडच्या काळात एआयच्या वाढत्या प्रभावामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतील 'अँथ्रोपिक' या एआय डेव्हलपरने 'Claude Cowork' हे टूल लाँच केल्याने आयटी सेवा कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलसमोर धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर टाटा सन्सच्या बोर्डाला टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडियामधील घडामोडींची माहितीही दिली जाणार आहे.
टाटा समूहाची आर्थिक कामगिरी आणि प्रगती
टाटा समूहासाठी २०२५ हे वर्ष आव्हानात्मक ठरले आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल २४ टक्क्यांच्या वाढीसह ५.९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला असला तरी, निव्वळ नफ्यात १७ टक्क्यांची घट होऊन तो २८,८९८ कोटी रुपयांवर आला आहे. होल्डिंग कंपनी म्हणून टाटा सन्सचा विविध टाटा कंपन्यांमध्ये ८ ते ७१.७५ टक्क्यांपर्यंत हिस्सा असून, या कंपन्यांकडून मिळणारा लाभांश हा टाटा सन्सच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा समूहाच्या सर्व लिस्टेड आणि नॉन लिस्टेड कंपन्यांचा एकूण महसूल १५.३४ लाख कोटी रुपये होता, तर निव्वळ नफा १.१३ लाख कोटी रुपये इतका होता.
एन. चंद्रशेखरन यांचा टाटा सन्स मधील प्रवास
टाटा समूहाचं सध्याचं मार्केट कॅप २४.३९ लाख कोटी रुपये आहे. एन. चंद्रशेखरन यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये दुसऱ्यांदा कार्यकाळ वाढवून देण्यात आला होता. त्यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात प्रवेश केला आणि जानेवारी २०१७ मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टर्मच्या प्रस्तावाकडे संपूर्ण कॉर्पोरेट जगाचं लक्ष लागलं आहे.
