Gold Price 55000 Rs: ट्रम्प यांच्या शुल्कामुळे जगभरातील शेअर बाजार हादरल्यानंतर आता सोन्याची किंमत ५०००० ते ५५००० पर्यंत येऊ शकते, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. यामागे अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म मॉर्निंगस्टारच्या एका विश्लेषकाचा हवाला दिला जात आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याचा भाव ५५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो.
रिपोर्टनुसार, जॉन मिल्सनं जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, जो सध्याच्या ३,०८० डॉलर प्रति औंसवरून १,८२० डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकतो. जॉन मिल्सच्या दाव्यांमध्ये किती ताकद आहे आणि इतिहास काय सांगतो, हे तज्ज्ञांच्या माध्यमातून समजून घेऊया.
केडिया कमोडिटीजच्या अध्यक्षांनी काही आकडेवारी देत सोन्याचे दर ५५००० पर्यंत जाण्याचा अंदाज फेटाळून लावला आहे. पाहूया काय म्हटलंय एक्सपर्टनं.
- २००८ च्या मंदीत एस अँड पी ५०० हे ५७.६९ टक्के, सोनं ३९.५६ टक्क्यांनी वधारलं.
- डॉट-कॉम क्रॅशमध्ये एस अँड पी ५०० हा ४९.२% नं घसरला, सोन्यानं २ वर्षात २१.६५% परतावा दिला.
- कोविड क्रॅशमध्ये शेअर्स ३५.७१% घसरले, सोनं ३२.४८% वाढलं.
- टॅरिफ वॉरदरम्यान एस अँड पी ५०० २१.८७ टक्क्यांनी घसरला होता, सोनं आधीच २१.१५ टक्क्यांनी वधारले होते आणि वाढण्याची शक्यता अधिक होती.
सोनं ९५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतं
इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा शेअर बाजार एका तिमाहीत २०% पेक्षा जास्त घसरतो तेव्हा सोन्याचे दर नक्कीच वाढतात. केडिया यांच्या म्हणण्यानुसार, येत्या ३ ते ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३२०० डॉलर आणि भारतात ९४ ते ९५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
इतिहास काय सांगतो?
गेल्या २५ वर्षांत जेव्हा जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण झाली तेव्हा सोन्याने गुंतवणूकदारांना सुरक्षितता आणि नफा दोन्ही दिले आहेत.
२००८ आर्थिक संकट: एस अँड पी ५०० ५७.६९%, सोनं ३९.५६% घसरलं.
डॉट-कॉम बबल फुटला: एस अँड पी ५०० ४९.२०%, सोनं २१.६५% घसरलं.
कोविड क्रॅश (२०२०): शेअर्स ३५.७१% घसरलं, सोनं ३२.४८% वधारलं.
सध्या सुरू असलेलं टॅरिफ वॉर: एस अँड पी ५०० २१.८७% टक्क्यांनी खाली, सोनं पूर्वीच्या तुलनेत २१.१५% नं वाढलं आणि २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ३१६७.७ डॉलरवर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
सोनं इतकं मजबूत का आहे?
सध्या सोन्याला मिळत आहेत पाच मोठे फायदे
१. भू-राजकीय तणाव (युद्ध, तणाव)
२. डी-डॉलरायझेशन
३. सेंट्रल बँक आणि ईटीएफ खरेदी
४. शेअर बाजारातील घसरण
५. महागाई आणि मंदीची भीती
पुढे काय?
अल्पावधीत सोनं थोडं स्थिर असले तरी ३-६ महिन्यांमध्ये यात तेजी येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३३४० डॉलरपर्यंत जाऊ शकतं. तर भारतात याची किंमत ९४,५०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतं. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर हळूहळू सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. जेव्हा बाजारात भीती निर्माण होते तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ होते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)