KYC For Fastag: एनएचएआयनं (NHAI) फास्टॅग युझर्ससाठी KYC प्रक्रिया आता सोपी केली आहे. आता केवायसी पूर्ण न केल्याससुद्धा फास्टॅग सेवा चालू राहतील. यापूर्वी लोकांना अनेक दस्तऐवज आणि फोटो अपलोड करावे लागत होते, परंतु आता ही प्रक्रिया सरळ आणि सुलभ झाली आहे.
केवायसीसाठी नवीन सोपी नियमावली
एनएचएआयची सहाय्यक कंपनी भारतीय हायवे व्यवस्थापन कंपनी लिमिटेडनं (IHMCL) निर्देश दिले आहेत की कार, जीप किंवा व्हॅनसाठी साइडचे फोटो (side pictures) आता आवश्यक नाहीत. आता केवळ वाहनाची नंबर प्लेट आणि फास्टॅग दर्शवणारा समोरील फोटोच (front picture) अपलोड करावा लागेल.
याव्यतिरिक्त, जेव्हा युझर वाहन नंबर, चेसिस नंबर किंवा मोबाईल नंबर एन्टर करेल, तेव्हा वाहन पोर्टलवरून नोंदणी तपशील आपोआप प्राप्त होईल. जर एकाच मोबाईल नंबरवर अनेक वाहने नोंदणीकृत असतील, तर ग्राहक सहजपणे त्या वाहनाची निवड करू शकतो ज्यासाठी त्याला केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
फास्टॅग सेवा बंद होणार नाहीत
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास फास्टॅग सेवा बंद केल्या जाणार नाहीत. आधी जारी केलेले फास्टॅग सक्रिय राहतील, ज्यामुळे वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तथापि, न लावलेले टॅग किंवा गैरवापराची तक्रार मिळाल्यास संबंधित कारवाई केली जाईल. फास्टॅग जारी करणाऱ्या बँका ग्राहकांना मोबाईलवर सतत मेसेज पाठवतील जेणेकरून ते केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
ग्राहक मदत आणि तक्रार निवारण
जर एखाद्या ग्राहकाला दस्तऐवज अपलोड करण्यात अडचण येत असेल, तर फास्टॅग जारी करणारी बँक थेट संपर्क साधून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करेल. याव्यतिरिक्त, ग्राहक केवायसीशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी आपल्या बँकांसोबतच एनएचएआयच्या हेल्पलाइन नंबर १०३३ वर तक्रार दाखल करू शकतात. या उपक्रमामुळे फास्टॅग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे, ज्यामुळे प्रवास आणि टोल पेमेंटचा अनुभव दोन्ही उत्तम होतील.
