Harsh Goenka on India US Trade Partner: 'भारतासाठीअमेरिका महत्त्वाचा भागीदार का आहे?', असा प्रश्न अधोरेखित करत प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सात कारणे मांडली आहेत. दीर्घकाळासाठी चांगला भागीदार म्हणून चीन आणि रशिया नव्हे तर अमेरिकाच महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्ष गोयंका यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. या पोस्टमध्ये हर्ष गोयंका यांनी भारताने अमेरिकेसोबतचे संबंध पुन्हा सुधारले पाहिजे. कारण ते भारताच्या विकासासाठी, सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रतिमेसाठी खूप महत्त्वाचे आहे, अशी भूमिका गोयंका यांनी मांडली आहे.
भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची का आहे?
हर्ष गोयंका यांनी एक भारत-अमेरिका भागीदारी महत्त्वाची असण्याकडे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी सात मुद्द्यांच्या आधारे ही गोष्टही पटवून दिली आहे.
१) अमेरिका अजूनही जागतिक पातळीवर एकमेव महासत्ता आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असण्याबरोबरच सर्वात मोठे लष्करी ताकद आणि जगात सर्वाधिक प्रभाव असलेला देश अमेरिका आहे.
२) भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश चीन नाहीये, तर अमेरिका आहे.
३) भारताचा अमेरिकेसोबत $40 बिलियन डॉलर शिल्लकीचा (सरप्लस) व्यापार आहे. दुसरीकडे चीनसोबत भारताची व्यापार तूट तब्बल $100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.
४) भारताला अमेरिकेकडून संरक्षण, तंत्रज्ञान, संशोधन या गोष्टींबरोबरच लोकशाही मूल्य एकसारखी असल्याचाही धोरणात्मक फायदा मिळतो.
५) संकटाच्या काळात (बांगलादेश युद्ध १९७१, कारगिल, अन्नटंचाई आणि दुष्काळ) अमेरिकेची मदत निर्णायक ठरली आहे.
६) भारत दीर्घकालीन भागीदार म्हणून चीन, रशिया वा इतर कोणत्याही देशावर विश्वास टाकू शकत नाही.
७) अमेरिकेसोबत पुन्हा विश्वासार्ह संबंध प्रस्थापित करणे, हेच भारताच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि जागतिक पातळीवरील प्रतिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. त्यानंतर भारताने पुन्हा चीनसोबतचे संबंध सुधारण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे. आगामी काळात पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावरही जाणार असून, तिथे शी जिनपिंग यांच्याशीही भेट घेणार आहे. याच सगळ्या पार्श्वभूमी हर्ष गोयंकांनी भारताच्या भागीदार देशाबद्दल मुद्दा मांडला आहे.