Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत निराशेचा ठरला. सत्राच्या सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव राहिल्याने बाजाराने मोठी घसरण नोंदवली. प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले. सत्राअखेर मुंबई शेअर बाजारचानिर्देशांक सेन्सेक्स ५५९ अंकांनी घसरून ८३,६७५ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी १४६ अंकांनी खालावून २५,८०७ च्या पातळीवर स्थिरावला.
आयटी निर्देशांकात ५ टक्क्यांची मोठी 'गळती'
आजच्या घसरणीचे मुख्य केंद्र 'आयटी' क्षेत्र राहिले. निफ्टी आयटी इंडेक्स ५ टक्क्यांहून अधिक कोसळला. कोफोर्ज, ओरॅकल फायनान्शिअल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत पडले. 'एंथ्रोपिक' सारख्या नवीन एआय टूल्समुळे पारंपारिक आयटी बिझनेस मॉडेल कालबाह्य होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकन बाजारातही सेल्सफोर्स आणि इनट्युईट यांसारख्या सॉफ्टवेअर शेअर्सवर दबाव दिसून आला.
जागतिक संकेत आणि डॉलरचे समीकरण
अमेरिकेतील मजबूत 'जॉब डेटा'मुळे (१.३० लाख नवीन नोकऱ्या) फेडरल रिझर्व्ह लवकर व्याजदर कपात करणार नाही, असे संकेत मिळत आहेत. याचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या 'एडीआर'वर झाला. तसेच, भारतातही विकासाचा वेग चांगला असल्याने आरबीआय लवकर रेट कट करण्याची शक्यता धूसर झाली आहे.
कच्च्या तेलाचा भडका आणि वाढती चिंता
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे 'ब्रेंट क्रूड' ०.५ टक्क्यांनी वधारून ६९.७२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्याने व्यापार तूट वाढण्याची भीती आहे. याचा फटका ऑईल अँड गॅस इंडेक्सला (१.५% घसरण) बसला असून एफएमसीजी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही विक्री दिसून आली.
वाचा - देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?
तज्ज्ञांचे काय आहे मत?
तज्ज्ञांनुसार, आयटी शेअर्समध्ये लगेच मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑटो, ज्वेलरी, हॉटेल आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांमध्ये तेजीचा कल कायम आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदार अजूनही खरेदीदार असल्याने बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये राहून पुन्हा उभारी घेऊ शकतो.
