China's Companies Suffer From Trump Tariffs: अमेरिकेच्या शुल्काचा मोठा फटका बसलेल्या चिनी कंपन्या मदतीसाठी भारतीय निर्यातदारांच्या संपर्कात आहेत. चीनमधील काही कंपन्या अमेरिकन ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी भारतीय निर्यातदारांशी संपर्क साधत आहेत, जेणेकरून ते आपली अमेरिकन ऑर्डर वेळेत पूर्ण करू शकतील. जगातील सर्वात मोठा व्यापार मेळावा असलेल्या ग्वांगझू येथील कँटोन फेअरमध्ये अनेक भारतीय कंपन्यांना चिनी कंपन्यांनी आपल्या अमेरिकन ग्राहकांना वस्तू पुरवण्यासाठी संपर्क साधल्याची माहिती समोर आलीये.
जगातील सर्वात मोठ्या व्यापार मेळाव्याची सुरुवात
'फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन'चे महासंचालक अजय सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी अनेक चिनी कंपन्या भारतीय निर्यातदारांच्या संपर्कात आहेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, विक्रीच्या बदल्यात भारतीय कंपनी चिनी व्यवसायिकांना कमिशन देईल. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांच्या शुल्कामुळे लक्ष्य झालेले अनेक चिनी निर्यातदार आग्नेय आशियाई देशांकडे वळले आहेत. यामध्ये काहींनी व्हिएतनाममध्ये कारखाने उभारले किंवा थायलंडसारख्या ठिकाणी माल पाठवला आणि तेथून ते अमेरिकेत निर्यात केले गेले. यावेळी ट्रम्प यांनी व्हिएतनामसारख्या देशांवर ४६ टक्के परस्पर शुल्क लादल्यानंतर भारतीय निर्यातदारांना अधिक ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
अधिक तपशील काय?
हँड टूल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस सारख्या क्षेत्रांसाठी सर्वाधिक संपर्क केला जात आहे. अमेरिकेचे काही ग्राहक थेट भारतीय पुरवठादारांशी चर्चा सुरू करतील, अशी अपेक्षा सहाय यांनी व्यक्त केली. सहाय म्हणाले की, चिनी कंपन्यांना दिलं जाणारं कमिशन खरेदीदार आणि पुरवठादार यांच्यात चर्चेद्वारे ठरवलं जाईल. ड्रॉप फोर्ज हॅमर आणि कोल्ड स्टॅम्प मशिन सारख्या हँड टूल्सची निर्मिती करणारी जालंधरची ओके टूल्स अमेरिकेच्या बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी चीन स्थित अमेरिकन कंपन्या आणि चिनी कंपन्यांशी बोलणी करत आहे.