Versace Acquisition: तुम्ही प्राडा (Prada) आणि वरसाचे (Versace) या ब्रँड्सची नावं ऐकली असतीलच. मोठे अभिनेते आणि स्टाईल आयकॉन या दोन्ही ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे दोन्ही फॅशन ब्रँड स्टेटस सिम्बॉल आहेत. सामान्य माणूस हे ब्रँड खरेदी करू शकत नाही, कारण त्यांच्या किमती खूप जास्त आहेत. प्राडाचे चष्मे २०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीपासून सुरू होतात, परफ्यूम ८-१० हजार रुपयांचे, तर लेदर बॅग २-३ लाख रुपयांना लिस्टेड आहेत. त्याचप्रमाणे, वरसाचेची सामान्य घड्याळं दीड-दोन लाखांपर्यंत पोहोचतात. ८-१० हजार रुपयांच्या रेंजमध्ये परफ्यूम विकले जातात आणि त्याची पोलो टी-शर्ट सुमारे ३० हजार रुपयांच्या रेंजमध्ये येते.
२०२५ पूर्वी हे दोन्ही ब्रँड एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते, पण २०२५ मध्ये काहीतरी असं घडलं की जगाला धक्का बसला. हे दोन्ही ब्रँड एकत्र आले. प्राडानं वरसाचेमध्ये १०० टक्के भागीदारी खरेदी केली. याला 'डील ऑफ द ईयर' म्हटलं जात आहे. इटलीतील मिलान शहरातून सुरू झालेले हे दोन्ही ब्रँड आज वेगळे नसले तरी, कधीकाळी त्यांच्यात तीव्र स्पर्धा होती.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
प्राडा आणि वरसाचेची सुरुवात
प्राडा ग्रुपची कहाणी १९१३ मध्ये सुरू झाली, जेव्हा मारिओ प्राडानं मिलानमध्ये चामड्याच्या वस्तूंचं एक छोटं दुकान उघडलं. १९७८ मध्ये मारिओ यांची नात मियूचिया प्राडा (Miuccia Prada) यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांनी त्याला नवीन रूप दिलं. मियूचिया यांनी असे डिझाईन्स तयार केले जे कदाचित पहिल्या दृष्टीक्षेपात 'अगली चिक' (Ugly Chic) वाटतील, पण त्यात एक वेगळा साधेपणा आणि क्लास होता. त्यांचे लक्ष कपड्यांचं क्लिन कटिंग आणि उत्कृष्ट मटेरियलवर होतं. प्राडा म्हणजे 'सायलेंट लक्झरी'.
दुसरीकडे, वरसाचेची कहाणी १९७८ मध्ये जियानी वरसाचे (Gianni Versace) यांनी सुरू केली. जियानी हे एक कलाकार होते, त्यांना भव्यता, रंग आणि ड्रामा आवडत होता. त्यांचे फॅशन बोल्ड, ग्लॅमरस आणि त्यात एक मोकळेपणा होता. 'मेडुसा'चा त्यांचा लोगो याच शाही आणि नाट्यमय स्टाईलचं प्रतीक होता. जियानींनी जगाला अशी फॅशन दिली, जी पाहून डोळे थबकले. एलीजाबेथ हर्लेचा तो सेफ्टी पिन ड्रेस किंवा सुपरमॉडेल्ससोबत त्यांचा रॅम्प वॉक, वरसाचे नेहमीच चर्चेत राहिले.
वरसाचे आधी कॅप्री होल्डिंग्सनं विकत घेतलं
जियानी वरसाचेच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण डोनाटेला वरसाचे (Donatella Versace) यांनी ब्रँड सांभाळला. २०१८ मध्ये अमेरिकन ग्रुप कॅप्री होल्डिंग्सनं वरसाचेला सुमारे २.१ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतलं. कॅप्री होल्डिंग्सकडे यापूर्वीच मायकल कॉर्स आणि जिमी चू सारखे ब्रँड होते.
पण कोरोनाच्या (Corana) काळात जग 'क्वाइट लक्झरी'कडे वळत असताना, वरसाचेचा बोल्ड आणि मॅक्सिमलिस्ट अंदाज थोडा फिका पडू लागला. कंपनीच्या महसुलात अपेक्षित वाढ झाली नाही. एकतर ब्रँडचं 'ओव्हरएक्सपोजर' झालं होतं, म्हणजे त्यांचं वितरण खूप वाढलं होतं, ज्यामुळे त्याची एक्सक्लुझिव्हिटी कमी झाली. दुसरं म्हणजे, डिझाइनमध्ये पूर्वीची स्पष्टता नव्हती. परिणामी, कॅप्री होल्डिंग्स कर्जात बुडू लागली आणि वरसाचे आपल्या शानदार इतिहासासह बाजारात 'अंडरपरफॉर्म' करत होता. वरसाचेचं नाव जगातील टॉप-१० ओळखल्या जाणाऱ्या ब्रँड्समध्ये असलं तरी, कमाई त्या प्रमाणात होत नव्हती. एका अर्थानं, इटलीचा तो चमकणारा तारा आपली चमक गमावत होता.
वरसाचे पुन्हा विक्रीला, प्राडाने साधली संधी
कॅप्री होल्डिंग्सनं वरसाचे विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा यात एक ट्विस्ट आला. आधी एका अमेरिकन ग्रुप टॅपेस्ट्री सोबत चर्चा सुरू होती, पण अँटिट्रस्ट रेग्युलेटर्सनी त्या करारावर प्रश्न उपस्थित करताच ती चर्चा थांबली. इथे प्राडा ग्रुपसाठी संधी निर्माण झाली. प्राडा ग्रुपचे चेअरमन पॅट्रिझिओ बेर्टेली आणि त्यांची पत्नी मियूचिया प्राडा यांचा मुलगा लोरेन्झो बेर्टेली यांना हा ब्रँड खरेदी करण्याची इच्छा होती. लोरेन्झो यांनीच या अधिग्रहणासाठी सर्वाधिक जोर दिला. त्यांना माहीत होतं की वरसाचे केवळ एक ब्रँड नसून, इटलीच्या फॅशन वारशाचा एक मजबूत भाग आहे.
एप्रिल २०२५ मध्ये तो क्षण आला, जेव्हा प्राडा ग्रुपने कॅप्री होल्डिंग्ससोबत वरसाचे खरेदी करण्याचा पक्का करार केला. त्याची किंमत सुमारे १.२५ अब्ज युरो निश्चित करण्यात आली. कॅप्री होल्डिंग्सनं वरसाचेमध्ये नुकसान सहन करून तो प्राडाला विकला. हा तो क्षण होता, जेव्हा मिलानचे दोन विरोधी आणि नेहमी प्रतिस्पर्धी राहिलेले ब्रँड एका छताखाली आले.
योगायोग: २ डिसेंबरला करार पूर्ण
डिसेंबर २०२५ मध्ये सर्व आवश्यक सरकारी मंजुरी मिळाल्यानंतर प्राडानं अधिकृतपणे वरसाचेचं अधिग्रहण पूर्ण केलं. करार पूर्ण होण्याची तारीख २ डिसेंबर होती आणि योगायोगाने याच दिवशी जियानी वरसाचेचा वाढदिवस देखील असतो.
प्राडा ग्रुपने सर्वात मोठी गोष्ट केली ती म्हणजे वरसाचेच्या 'क्रिएटिव्ह डीएनए'मध्ये बदल न करण्याचा प्रयत्न. प्राडानं त्यांची ओळख कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं.
या अधिग्रहणाने प्राडा ग्रुपला लक्झरी जगात एक नवीन ओळख दिली आहे. हा आता केवळ एक 'मिलान-आधारित' ब्रँड राहिलेला नाही, तर एलव्हीएमएच आणि केरिंग यांसारख्या फ्रेंच दिग्गजांशी टक्कर देणारा एक मजबूत 'इटालियन पॉवरहाऊस' बनला आहे. १.३७५ अब्ज डॉलरच्या या करारामुळे कॅप्री होल्डिंग्सला आपलं कर्ज फेडण्यास मदत मिळाली आणि प्राडाला एक असा ब्रँड मिळाला, जो त्याला अनेक वर्षांपासून हवा होता. आज, वरसाचे आणि प्राडा दोन्ही एकाच कुटुंबाचा भाग आहेत, परंतु आपापल्या 'क्रिएटिव्ह स्पेस' मध्ये स्वतंत्र आहेत.
