Vedanta Group Successor: देशातील दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेल्या वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासाठी २०२६ या वर्षाची सुरुवात एका मोठ्या धक्क्यानं झाली आहे. त्यांचे सुपुत्र अग्निवेश अग्रवाल (वय ४९ वर्षे) यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडलं आहे. सर्वच श्रेत्रातील व्यक्तींनी आपल्या संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
कोण आहेत अनिल अग्रवाल?
अनिल अग्रवाल हे 'वेदांता रिसोर्सेस'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. १९७६ मध्ये त्यांनी एका छोट्या केबल कंपनीतून या प्रवासाची सुरुवात केली होती. अत्यंत कमी वयात त्यांनी आपल्या वडिलांसोबत भंगार व्यवसायात पाऊल ठेवलं. अनेकदा अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही आणि हळूहळू वेदांताला धातू, खाणकाम, वीज आणि तेल अशा मोठ्या क्षेत्रांत उभं केलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन अब्जावधींची कंपनी उभी करणाऱ्या अनिल अग्रवाल यांची कथा सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतातील १ कप चहाच्या किमतीत व्हेनेझुएलात मिळतंय ३ लिटर पेट्रोल; जाणून घ्या किती आहेत दर?
अनिल अग्रवाल यांचं कुटुंब
अनिल अग्रवाल यांचे कुटुंब त्यांच्या साधेपणासाठी ओळखलं जातं. त्यांच्या कुटुंबात पत्नी किरण अग्रवाल आहेत, ज्या प्रसिद्धीच्या झोतात न राहता कुटुंबाचा आधार राहिल्या आहेत. अनिल अग्रवाल यांना दोन अपत्ये होती – मुलगा अग्निवेश अग्रवाल आणि मुलगी प्रिया अग्रवाल. नुकतेच त्यांचा मुलगा अग्निवेश यांचे अमेरिकेत उपचारादरम्यान 'कार्डियाक अरेस्ट'मुळे निधन झालं. मुलाच्या निधनानंतर भावूक होत अनिल अग्रवाल म्हणाले की, तो फक्त माझा मुलगा नव्हता, तर माझा सर्वात जवळचा मित्र आणि माझा अभिमान होता.
अग्निवेश अग्रवाल यांचं व्यवसायातील स्थान
अग्निवेश अग्रवाल यांनी व्यावसायिक विश्वात आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांनी 'फुजैराह गोल्ड' (Fujairah Gold) सारखी कंपनी उभी केली होती आणि ते 'हिंदुस्तान झिंक'चे अध्यक्षही राहिले होते. याव्यतिरिक्त, ते वेदांता समूहातील 'तलवंडी साबो पॉवर लिमिटेड'च्या बोर्डावर देखील कार्यरत होते.
मुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
अनिल अग्रवाल यांची कन्या प्रिया अग्रवाल सध्या वेदांता आणि हिंदुस्तान झिंकच्या बोर्डावर आहेत. त्या हिंदुस्तान झिंकच्या 'चेअरपर्सन' म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. व्यवसायावरील त्यांची मजबूत पकड पाहता, येणाऱ्या काळात वेदांता समूहाची संपूर्ण धुरा त्यांच्याच खांद्यावर राहण्याची शक्यता आहे.
अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती
भंगार व्यवसायातून प्रवास सुरू करणारे अनिल अग्रवाल आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. 'फोर्ब्स'च्या ताज्या रिपोर्टनुसार, अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ४.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण ३५,००० कोटी रुपये आहे.
एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक असूनही अनिल अग्रवाल आपल्या दानशूर स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी 'गिव्हिंग प्लेज' (Giving Pledge) अंतर्गत आपल्या संपत्तीतील ७५ टक्के हिस्सा समाजसेवेसाठी दान करण्याचं वचन दिलं आहे. मुलाच्या निधनानंतर त्यांनी भावूक होत म्हटलं की, आता ते अधिक साधेपणाने जीवन जगतील आणि अग्निवेश यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजसेवेची कामं अधिक वेगानं पुढे नेतील.
कोण सांभाळणार स्वप्नांचा वारसा?
अग्निवेश अग्रवाल यांचं वयाच्या ४९ व्या वर्षी होणारे निधन हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. आता अनिल अग्रवाल यांचं संपूर्ण लक्ष आपली कन्या प्रिया अग्रवाल यांच्यासह भारताला स्वावलंबी बनवण्याच्या मोहिमेवर असेल. अग्निवेश यांचं स्वप्न होतं की, देशात कोणतंही मुल उपाशी झोपू नये आणि प्रत्येक तरुणाला काम मिळावं; याच संकल्पासह आता अग्रवाल कुटुंब पुढे जाणार आहे.
