Pakistan Richest Man : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची चर्चा नेहमीच होत असते. या श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेकांसोबत भारतातील मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचंही नाव असतं. आपला शेजारी देश पाकिस्तान नेहमीच आर्थिक संकट, महागाई आणि कर्ज या गोष्टींमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर तेथील धान्याचे भाव, भाज्यांचे भाव यांच्याही बातम्या येत असतात. पण पाकिस्तानातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण अशी फारशी चर्चा बघायला मिळत नाही. खरंतर पाकिस्तानातही अनेक मोठे उद्योगपती आहेत. ज्यांनी अब्जो डॉलरची संपत्ती कमावली आहे. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, पाकिस्तानातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आणि ते काय करतात.
पाकिस्तानातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती
पाकिस्तानातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती रईस आदमी शाहिद खान याना मानलं जातं. ते एक ग्लोबल बिझनेसमन आहेत. शाहिद खान मूळ पाकिस्तान वंशाचे आहेत. पण आज ते अमेरिकेत राहतात. Flex-N-Gate नावाच्या कंपनीद्वारे त्यानी ऑटोमोबाइल क्षेत्रात नाव कमावलं. ऑटो पार्ट्स सप्लाय क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. त्याशिवाय शाहिद खान हे खेळ विश्वातही सक्रिय आहेत. ते Jacksonville Jaguars चे मालक आहेत आणि इंग्लंडमधील फुटबॉल क्लब Fulham F.C. मध्ये त्यांची भागीदारी आहे. त्यांची एकूण संपत्ती साधारण १३.३ ते १३.७ अब्ज डॉलर इतकी सांगितली जाते. खास बाब ही आहे की, ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते आणि सुरूवातीच्या दिवसांमध्ये खर्च भागवण्यासाठी हॉटेलमध्ये भांडीही घासत होते.
एका डिझाइनने बदललं नशीब
१९७१ मध्ये अमेरिकेत त्यानी ग्रँजर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून इंडस्ट्रिअल इंजिनिअरींगची डिग्री घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर शाहिद खान यानी वन-पीस ट्रकचं डिझाइन तयार केलं होतं. हेच त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. नंतर त्यांनी Flex-N-Gate कॉर्पोरेशन कंपनी जॉइन केली. काही वर्षांनी कंपनीचे मालकांनी कंपनी विकायला काढली. तेव्हा शाहिद यांनी ती विकत घेतली. तेव्हापासून कंपनी अधिक वाढली. आज जगात या कंपनीने ७६ प्लांट आहेत, ज्यात २५ हजारांपेक्षा जास्त लोक काम करतात.
पाकिस्तानातील दुसरे मोठे उद्योगपती
पाकिस्तानात केवळ शाहिद खान हेच मोठे उद्योगपती नाहीत. इतरही अनेक मोठी नावं आहेत जे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका निभावतात. मियाँ मुहम्मद मंश निशात ग्रुपचे मालक आहेत. ते टेक्सटाइल बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रात उद्योग करतात. त्यांची एकूण संपत्ती साधारण ५ अब्ज डॉलर इतकी सांगितली जाते. तर परवेज बेस्टवे ग्रुपचे संस्थापक आहेत, त्यांची संपत्ती साधारण तीन अब्ज डॉलर सांगितली जाते. यांच्याशिवाय नासिर शान, शान फूड्सचे मालक आहेत, त्यांनी पाकिस्तानी मसाल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.
