अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. जीत अदानी हे दिवा जैमिन शाह यांच्यासोबत विवाह करणार आहेत. ७ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये हे जोडपं विवाहबंधनात अडकेल. गौतम अदानी यांच्या वडिलांचे नाव जैमिन शाह असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी आणि शाह यांच्यातील अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
जैमिन शाह काय करतात?
जैमीन शाह सुरतमधील एक मोठे हिरे व्यापारी आहे. सी दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांच्या कंपनीचे नाव आहे. त्यांच्या कंपनीची स्थापना १९७६ साली झाली. कंपनीचं मुख्यालय मुंबई आणि सुरत येथे आहे. त्यांची कंपनी देश-विदेशातील अनेक कंपन्यांना हिरे विकते. गेल्या काही वर्षांत कंपनीनं आपल्या टीमचा विस्तार केला आहे. जिगर दोशी, अमित दोशी, जैमिन शहा आदी दैनंदिन कामकाज सांभाळतात.
जैमिन शहा यांच्याकडे किती संपत्ती?
जैमिन शाह यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र, वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची नेटवर्थ वेगवेगळी सांगितली जात आहे.
ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्समध्ये जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. यात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक भारतीय उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. पण त्यात जैमिन शहा यांच्या नावाचा उल्लेख नाही. अदानी ७३.९ अब्ज डॉलरसंपत्तीसह जगातील २१ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
जीत अदानी काय करतात?
गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव जीत अदानी यांनी २०१९ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर ते अदानी समूहात रुजू झाले. सध्या ते अदानी समूहात उपाध्यक्ष (ग्रुप फायनान्स) म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे अदानी विमानतळ, अदानी डिजिटल लॅब्स आदींची जबाबदारी आहे.