Cyrus Poonawalla Net Worth: भारतातील दिग्गज उद्योगपती सायरस पूनावाला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी केलेली एक ऐतिहासिक खरेदी. त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांचं ‘यशोदा आणि कृष्ण’ हे दुर्मिळ पेंटिंग सुमारे १६७.२ कोटी रुपयांना विकत घेतलंय. आज पूनावाला यांचं नाव केवळ श्रीमंतीपुरतं मर्यादित नसून, भारताला लसीकरणाच्या बाबतीत जगाचे ‘पॉवरहाऊस’ बनवणारे उद्योजक म्हणून घेतलं जातं. पुण्याच्या एका छोट्या सेटअपपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर पसरला असून, त्यांची कंपनी जगातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचलीये.
छोट्या फार्महाऊसपासून उभं केलं साम्राज्य
सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ची स्थापना केली. सुरुवातीला हे काम घोड्यांपासून सीरम काढण्याशी संबंधित होतं, परंतु तिथूनच त्यांनी एक मोठी संधी ओळखली. स्वस्त आणि दर्जेदार लसी तयार केल्यास संपूर्ण जगात मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी बनली आहे.
गोवर, पोलिओ, रुबेलापासून ते कोविडपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या संकटात या कंपनीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूनावाला यांची सर्वात मोठी ताकद त्यांचं बिझनेस मॉडेल राहिलंय. त्यांनी महागड्या लसींऐवजी कमी किमतीत जास्त उत्पादन करण्याचा मार्ग निवडला, ज्यामुळे त्यांच्या लसी जगातील १७० पेक्षा जास्त देशांत पोहोचतात. एका अंदाजानुसार, जगातील दर तीनपैकी दोन बालकांना त्यांच्या कंपनीची किमान एक लस नक्कीच टोचली जाते, म्हणूनच त्यांना जागतिक स्तरावर ‘व्हॅक्सीन किंग’ म्हटले जातं.
कोविड काळात मोलाची कामगिरी
कोरोना महासाथीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग लसीसाठी संघर्ष करत होतं, तेव्हा सायरस पूनावाला यांनी मोठी कामगिरी केली. लसीच्या यशाबाबत अनिश्चितता असतानाही त्यांनी मोठी गुंतवणूक करून उत्पादन सुरू केलं. त्यांच्या कंपनीनं ‘कोविशील्ड’ लसीच्या माध्यमातून केवळ भारतालाच नाही तर अनेक देशांना दिलासा दिला, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली. आज सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहेत. २०२२ मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ देऊन गौरवण्यात आलं. आता राजा रवि वर्मा यांच्या पेंटिंगच्या खरेदीने त्यांनी आर्ट आणि कल्चर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक असल्याचं सिद्ध केलं आहे.
अफाट नेटवर्थ आणि उत्पन्नाचे स्रोत
२०२६ च्या ताज्या अंदाजानुसार, सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती सुमारे २४.८ अब्ज डॉलर ते २७ अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे, जी भारतीय रुपयांत अंदाजे २.१ लाख कोटी ते २.३ लाख कोटी रुपये इतकी होते. त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा हिस्सा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून येतो. याच कारणामुळे ते भारतातील टॉप श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं आपले स्थान टिकवून आहेत.
आलिशान मालमत्ता आणि भव्य जीवनशैली
स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही पूनावाला यांची शैली राजेशाही आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी भागातील त्यांचा प्रसिद्ध ‘लिंकन हाऊस’ सुमारे ७५० कोटी रुपयांना खरेदी केला होता, ज्याचं आजचे मूल्य ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मानलं जातं. याशिवाय लंडनमधील मेफेअर भागात त्यांचा ‘एबरकॉनवे हाऊस’ आहे, ज्याची किंमत सुमारे १,४०० कोटी रुपये सांगितली जाते. पुण्यात त्यांचं मोठं निवासस्थान आणि २५० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेलं स्टड फार्म आहे, जिथून त्यांच्या घोड्यांच्या जुन्या व्यवसायाची झलक आजही दिसते.
कार्सचं कलेक्शन आणि इतर महागड्या मालमत्ता
कार्सच्या बाबतीत पूनावाला कुटुंब हे भारतातील सर्वात मोठं ‘रॉल्स रॉयस’ कलेक्टर मानलं जातं. त्यांच्या ताफ्यात फँटमचे अनेक मॉडेल्स आणि काही कस्टमाइज्ड लिमोझिन गाड्या आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ३० पेक्षा जास्त विंटेज आणि क्लासिक कार्स आहेत, ज्यामध्ये बेंटले, फेरारी आणि कॅडिलॅक सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. तसंच त्यांच्याकडे लॅम्बोर्गिनी सारख्या हाय-एंड स्पोर्ट्स कार देखील आहेत. पूनावाला यांच्याकडे स्वतःची एव्हिएशन कंपनी ‘पूनावाला एव्हिएशन’ असून त्यांच्याकडे बिझनेस जेट्स आणि हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. पुण्यातील ‘रिट्झ कार्लटन’ हॉटेलमध्येही त्यांची भागीदारी असून ‘पूनावाला फिनकॉर्प’च्या माध्यमातून त्यांचा आर्थिक क्षेत्रात मोठा दबदबा आहे. १६७ कोटींचे पेंटिंग खरेदी करून त्यांनी आपले आर्ट कलेक्शनही कोणापेक्षा कमी नसल्याचं दाखवून दिलंय.
