PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) सरकारनं आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता देशभरातील शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यात पाठवते. या योजनेचा पुढचा हप्ता आता नवीन वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये जारी केला जाणार आहे.
२२ वा हप्ता कधी जारी होणार?
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या हप्त्यांबाबत अधिकृत माहिती दिली जाते. २२ व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी २१ वा हप्ता जारी केला होता. नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो, त्यामुळे पुढचा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च २०२६ मध्ये जारी केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
योजनेच्या रकमेत वाढ होणार का?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणाच्या विविध योजना जाहीर केल्या जातील. जर केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. मात्र, सध्या मिळणाऱ्या २-२ हजार रुपयांच्या हप्त्यात वाढ केली जाईल, असे कोणतेही संकेत सरकारने अद्याप दिलेले नाहीत.
या चुकांमुळे हप्ता थांबू शकतो
ज्या शेतकऱ्यांकडे 'फार्मर्स आयडी' (Farmers ID) नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, ज्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनाही पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. जमिनीची पडताळणी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला २२ व्या हप्त्याची रक्कम विनाअडथळा हवी असेल, तर सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा.
