Indian Economy News: भारताचीअर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, आता ती जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारतानं आता जपानलाही मागे टाकलं आणि लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्सनुसार, हे स्वप्न आता फार लांब नाही. भारत सध्या ४.१८ ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह चौथ्या क्रमांकावर आहे.
पुढील दोन-तीन वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. सध्या जगातील टॉप १० अर्थव्यवस्थांच्या यादीत कोणकोणते देश आहेत आणि त्यात पाकिस्तानसारख्या शेजारील देशाचा समावेश आहे की नाही, हे जाणून घेऊ.
कधी पोहोचणार भारत तिसऱ्या क्रमांकावर?
२०२५ च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका असून त्यांचा जीडीपी ३०.६ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन (१९.४ ट्रिलियन डॉलर) आहे. तिसऱ्या स्थानावर जर्मनी असून त्यांची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. भारतानं चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून जपान पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. त्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा आणि ब्राझील यांसारखे देश टॉप १० मध्ये आहेत.
जर्मनीला मागे टाकण्यासाठीचे अंदाज
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर संस्थांच्या अहवालानुसार, भारत २०२७ किंवा २०२८ पर्यंत जर्मनीला मागे टाकू शकतो. 'एस अँड पी ग्लोबल' (S&P Global) नुसार, २०३०-३१ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि भारताचा जीडीपी ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. 'पीडब्ल्यूसी'च्या (PwC) अहवालात तर २०५० पर्यंत भारत दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी भविष्यवाणी केली आहे. तेव्हा चीन पहिल्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल.
पाकिस्तान टॉप १० मध्ये आहे का?
सध्याच्या आर्थिक सुधारणांमुळे रशिया पुन्हा एकदा टॉप १० मध्ये स्थान मिळवत आहे. मात्र, टॉप १० मध्ये पाकिस्तानचे नाव कुठेही नाही. पाकिस्तानचा जीडीपी सुमारे ४१० अब्ज डॉलर असून तो जगात ४२ व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पाकिस्तान भारताच्या खूप मागे असून टॉप १० मध्ये येण्यासाठी त्यांना मोठा प्रवास करावा लागेल. जिथे भारताची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे, तिथे पाकिस्तानचा विकास दर केवळ २-३ टक्क्यांच्या आसपास आहे.
