Bank Locker Jewellery Rules: मौल्यवान दागिने आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा सहसा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. परंतु, जर बँकेच्या लॉकरमधूनच सामान चोरीला गेलं, तर ग्राहकाकडे नेमके काय पर्याय उरतात? अशा परिस्थितीत बँकेची जबाबदारी किती असते आणि नुकसान भरपाई कशी मिळते, या प्रश्नांबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नियमांनुसार, बँक लॉकर हा एक सुरक्षित धातूचा बॉक्स असतो जो बँकेच्या 'स्ट्राँग रूम' किंवा 'वॉल्ट'मध्ये ठेवला जातो. बँक ठराविक शुल्क आकारून ग्राहकांना ही सुविधा भाड्यानं देते. लॉकरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी युनिक चावी, ड्युअल-की सिस्टम किंवा डिजिटल ॲक्सेस यांसारख्या यंत्रणांचा वापर केला जातो आणि केवळ ग्राहक किंवा त्यानं अधिकृत केलेल्या व्यक्तीलाच तिथे प्रवेश दिला जातो.
एकेकाळी मनात आलेला आत्महत्येचा विचार, नंतर केलं असं काही की बनवलं ५०० कोटींचं फॅशन एम्पायर
लॉकरमधून चोरी झाल्यास काय करावं?
जर तुमच्या बँक लॉकरमधून चोरी झाल्याचं लक्षात आलं, तर सर्वात आधी संबंधित बँक शाखेत लेखी तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. या प्रकरणाची चौकशी करणं आणि लॉकरमधील साहित्याचं नुकसान झालं आहे का, याची खात्री करणं ही बँकेची जबाबदारी असते. यानंतर, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे. ही एक कायदेशीर प्रक्रिया असून भविष्यात नुकसान भरपाई किंवा विमा क्लेम मिळवण्यासाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. जर ही चोरी बँकेचा निष्काळजीपणा, सुरक्षेतील त्रुटी किंवा कर्मचाऱ्यांची फसवणूक यामुळे झाली असल्याचं सिद्ध झालं, तर रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकाला नुकसान भरपाई देणे बँकेला बंधनकारक आहे.
नुकसान भरपाईचं स्वरूप आणि बँकेची जबाबदारी
दुर्दैवानं बँकेच्या निष्काळजीपणामुळे किंवा सुरक्षेतील त्रुटींमुळे चोरी झाली असल्यास, आरबीआयच्या नियमांनुसार बँकेला ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी लागते. अशा परिस्थितीत, बँकेला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून देणं अनिवार्य आहे. या नियमामुळे ग्राहकाच्या नुकसानाची काही अंशी भरपाई होते आणि बँकेवर आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत ठेवण्यासाठी दबाव राहतो. तसंच, अनेक बँका लॉकरमधील सामानासाठी विम्याची सुविधाही देतात. जर लॉकर विमा संरक्षणाखाली असेल, तर ग्राहक विमा कंपनीकडून क्लेम करून आपल्या नुकसानाची भरपाई करून घेऊ शकतात.
नैसर्गिक आपत्ती आणि लॉकरमधील साहित्याचे नुकसान
जर बँक लॉकर किंवा त्यातील वस्तू बँकेच्या चुकीमुळे, जसं की वॉल्टची योग्य देखभाल न केल्यामुळे किंवा बांधकामातील त्रुटीमुळे खराब झाल्या, तर बँक त्याला जबाबदार धरली जाऊ शकते. मात्र, जर हे नुकसान भूकंप, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालं असेल आणि त्यात बँकेचा कोणताही निष्काळजीपणा नसेल, तर बँकेची जबाबदारी मर्यादित असू शकते. अशा अनपेक्षित नुकसानापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी आपल्या लॉकरमधील वस्तूंचा विमा उतरवून घेणं हा एक सुरक्षित मार्ग ठरतो.
