एखाद्या देशाच्या रिझर्व्ह बँकेकडे जेवढे सोने तेवढा तो देश श्रीमंतच नाही तर कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे मानले जाते. जगावर एखादे संकट येऊ लागताच शेअर बाजारातील धुरंधरही पैसा काढून सोन्यात गुंतवणूक करतात. एवढेच नाही तर देशही त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवत असतात. सध्या जगावर तशी वेळ येऊ घातली आहे. म्हणूनच सर्व देशांच्या रिझर्व्ह बँका सोन्याचा साठा वाढविण्याच्या कामाला लागल्या आहेत.
आता येऊ घातलेले संकट आहे ट्रम्पचे टेरिफ वॉर. तज्ञांच्या मते हे संकट एवढे भयाण असणार आहे की, जगावर कोरोनानंतर आधीच वाढलेल्या महागाईत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. ज्याच्याकडे सोन्याचा खजाना, तो जगात हवे ते घडवू शकतो, असे कोलंबस ५०० वर्षांपूर्वी म्हणाला होता. त्याचीच सोय आता जगभरातील देश करू लागले आहेत. कोरोना काळानंतर जगभरातील अर्थव्यवस्थांनी सोन्याच्या खरेदीकडे कल वाढविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रिझर्व्ह बँका खरेदी करत असलेले सोने हे १००० टनांपेक्षा जास्त आहे.
२०२४ मध्ये जगभरातील बँकांनी १०४५ टन सोने खरेदी केले होते. २०२३ मध्ये हा आकडा १०३७ टन एवढा होता. २०२२ मध्ये रेकॉर्डब्रेक म्हणजेच ११३६ टन सोने या बँकांनी खरेदी केले होते. एकट्या आरबीआयनेच २०२४ मध्ये ७२.६ टन सोने खरेदी केले आहे. तर पोलंडच्या बँकेने सर्वाधिक ९० टन सोने खरेदी केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आरबीआयकडे 876.18 टन सोने होते. ज्याची किंमत 66.2 बिलियन डॉलर एवढी होती.
का वाढलीय सोन्याची मागणी...
सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामागे अनेक भू-राजकीय कारणे आहेत. ट्रम्प यांचे पुनरागमन, ट्रम्प यांचे अस्थिर व्यापार धोरणे, व्यापारी शस्त्र म्हणून शुल्काचा वापर, हमास-इस्रायल युद्ध, युक्रेन-रशिया युद्ध, साथीच्या रोग येण्याची भीती यामुळे अनेक देशांच्या बँका सोन्याचा साठा करून ठेवत आहेत. २०२५ सालाचे देखील ४० दिवस लोटले आहेत. या काळात देखील सोन्याच्या मागणीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच सोन्याची किंमतही कमालीची वाढली आहे. यावरून जगाला ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरच्या संकटाचा धोका जाणवू लागल्याचे दिसत आहे.