IT Employee Salary Reduced : आयटी क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार लाखांच्या घरात जातो, असे मानले जाते. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका जावा डेव्हलपरने शेअर केलेली आपली व्यथा सध्या आयटी वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. देशातील प्रसिद्ध आयटी कंपनीत साडेपाच वर्षे काम केल्यानंतर या कर्मचाऱ्याचा 'इन-हँड' पगार वाढण्याऐवजी चक्क कमी झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतील एका तरुणाने २०२० मध्ये टीअर-३ कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर आयटी कंपनीमध्ये जावा डेव्हलपर म्हणून कारकीर्द सुरू केली. तेव्हा त्याचा महिना 'इन-हँड' पगार साधारण २५,००० रुपये होता. साडेपाच वर्षांच्या अनुभवानंतर, आज त्याच्या हातात फक्त २२,८०० रुपये येत आहेत. पाच वर्षांनंतर पगार वाढण्याऐवजी तो २,२०० रुपयांनी कमी झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कामाची संस्कृती आणि मूल्यांकन पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पगार का घटला? खुद्द कर्मचाऱ्याचाच खुलासा
या अजब परिस्थितीला कंपनीपेक्षा स्वतःची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे या तरुणाने मान्य केले आहे. त्याने पोस्टमध्ये नमूद केले की, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात त्याने नवीन तंत्रज्ञान शिकण्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. खासगी नोकरी करत असताना तो सरकारी नोकरीच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होता. यामुळे ऑफिसच्या कामावर परिणाम झाला. सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे त्याला कंपनीकडून 'C' आणि 'D' अशा अत्यंत कमी रेटिंग्स मिळाल्या. कामगिरी सुधारण्यासाठी कंपनीने त्याला 'परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅन'मध्ये टाकले. यामुळे त्याची नोकरी वाचली असली, तरी पगारवाढ आणि बोनसवर पूर्णपणे बंदी आली.
पगार कमी होण्याचे तांत्रिक गणित
एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार स्थिर असताना तो हातात कमी का येतो, याची काही प्रमुख कारणे आहेत.
- व्हेरिएबल पे मधील कपात : आयटी कंपन्यांमध्ये पगाराचा मोठा हिस्सा तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो. रेटिंग खराब असल्यास कंपनी 'व्हेरिएबल पे'मध्ये मोठी कपात करते.
- कंपलसरी डिडक्शन्स : भविष्य निर्वाह निधी आणि प्रोफेशनल टॅक्समधील कपात वाढल्यास आणि मूळ पगारात वाढ न झाल्यास हातात येणारी रक्कम कमी होते.
- टॅक्स नियमातील बदल : नव्या कर प्रणालीनुसार होणारी कपातही याला कारणीभूत ठरू शकते.
वाचा - पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
तरुण प्रोफेशनल्ससाठी धोक्याची घंटा
ही पोस्ट सध्या व्हायरल होण्याचे मुख्य कारण म्हणजे आयटी क्षेत्रातील वाढती स्पर्धा. "केवळ नोकरी मिळवणे पुरेसे नाही, तर ती टिकवण्यासाठी सतत स्वतःला अपडेट ठेवणे किती गरजेचे आहे," हेच या प्रकरणातून समोर येते.
