Fitness coach Vinod Channa fees: मुंबईतील प्रसिद्ध सेलेब्रिटी फिटनेस कोच विनोद चन्ना यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये आपल्या ट्रेनिंग फीबाबत खुलासा केला आहे. वेट ट्रेनिंग, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, डाएट मॅनेजमेंट, न्यूट्रिशन गायडन्स आणि इंज्युरी रिहॅब या सर्व क्षेत्रांत ते तज्ज्ञ मानले जातात.
विनोद चन्ना यांनी आतापर्यंत जॅकलीन फर्नांडिस, जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, हर्षवर्धन राणे यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांपासून ते देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबापर्यंत अनेकांना फिटनेस कोचिंग दिली आहे. विशेष म्हणजे अनंत अंबानी यांचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा चन्ना यांनीच केले होते.
फी किती घेतात?
विनोद चन्ना यांनी पॉडकास्टमध्ये आपल्या फीबाबत खुलासा केला. ते म्हणाले, मी ऑनलाइन ट्रेनिंगसाठी 12 सेशन्सचे 1 लाख रुपये चार्ज करतो. माझे क्लायंट जगभर असतात. जर कोणी माझ्या जिमला येत असेल किंवा मला त्यांच्या ठिकाणी बोलावत असेल, तर अंतर आणि माझा वेळ लक्षात घेऊन मी महिन्याला दीड, अडीच किंवा तीन लाख रुपये शुल्क घेतो.
काही क्लायंट्ससोबत मी ट्रॅव्हलही करतो. अशा वेळी एका दिवसाचा खर्चही लाखोंमध्ये जाऊ शकतो. सेलिब्रिटी आणि बिझनेस टायकून्सकडे वेळ कमी असल्याने ते जिथे असतात, तिथेच मी त्यांना ट्रेन करतो. दरम्यान, यावरुनच समजते की, मोठे सेलिब्रिटी किंवा उद्योगपतींमध्ये विनोद यांची किती मागणी असते.
साध्या घरातून सुरुवात...
विनोद चन्ना यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनोद यांच्या घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाल्याने घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी हाऊसकीपिंग आणि स्वीपरचे काम केले. जिममध्ये पहिली नोकरी मिळाली ती फ्लोर ट्रेनर म्हणून, ज्यासाठी त्यांना फक्त 600-700 रुपये मिळत असत. दिवसभर मशीन साफ करणे, प्लेट्स लावणे हेच त्यांचे काम होते. लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्यांनी फिटनेस क्षेत्रातील कौशल्य वाढवत स्वतःचे करिअर घडवले. आज ते भारतातील सर्वात महागडे ट्रेनर म्हणून ओळखले जातात.
