पहिल्याच दिवशी विभोर स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. विभोर स्टील ट्यूब्सचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 181 टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह 425 रुपयांवर लिस्ट झाले. तर बीएसईवर कंपनीचे शेअर्स 179 टक्क्यांच्या वाढीसह 421 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 151 रुपयांना अलॉट करण्यात आले. म्हणजेच आयपीओ लिस्ट होताच विभोर स्टील ट्युब्सचे शेअर्स अलॉट झालेल्या गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट फायदा झाला आहे. कंपनीचा आयपीओ 13 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 15 फेब्रुवारीपर्यंत खुला होता.
शेअर्समध्ये तेजी
लिस्टिंगनंतर लगेचच, विभोर स्टील ट्यूब्सचे शेअर्स बीएसईमध्ये 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 442 रुपयांवर पोहोचले. गुंतवणूकदारांना 151 च्या इश्यू प्राईजच्या तुलनेत 193 टक्क्यांचा नफा कमावला आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स एनएसईमध्ये 443.50 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. कंपनीच्या आयपीओची एकूण साईज 72.17 कोटी रुपये होती. विभोर स्टील ट्यूब्सच्या आयपीओमध्ये, किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 99 शेअर्स होते. विभोर स्टील ट्यूब्सची स्थापना 2003 मध्ये झाली. कंपनी स्टील पाईप्स आणि ट्यूब बनवण्याचं आणि पुरवण्याचं काम करते.
320 पट सबस्क्रिप्शन
विभोर स्टील ट्यूब्सचा आयपीओ एकूण 320.05 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सची कॅटेगरी 201.52 पट सबस्क्राईब झाली होती. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये (NII) श्रेणीमध्ये 772.49 पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरी 191.41 पट सबस्क्राईब झाली होती. तर दुसरीकडे विभोर स्टील ट्यूब्सच्या आयपीओमधील कर्मचाऱ्यांचा कोटा 215.79 पट सबस्क्राइब झाला होता.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)