Bitcoin Reserve : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, अमेरिकेची ही कारवाई केवळ तिथल्या अफाट तेल साठ्यासाठी आहे की त्यामागे एखादा गुप्त 'डिजिटल खजिना' आहे, या चर्चेने आता जोर धरला आहे. वेनेझुएलाकडे तब्बल ६० अब्ज डॉलर (सुमारे ५ लाख कोटी रुपये) किमतीचा 'बिटकॉइन' साठा असल्याचा खळबळजनक दावा काही आंतरराष्ट्रीय तपास अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
२४० की ६ लाख बिटकॉइन? आकड्यांचा खेळ
व्हेनेझुएलाच्या बिटकॉइन साठ्याबाबत दोन परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. 'बिटकॉइन ट्रेझरीज'च्या मते, वेनेझुएला सरकारकडे अधिकृतपणे केवळ २४० बिटकॉइन आहेत, ज्यांची किंमत सुमारे १८० कोटी रुपये आहे. तर 'AMBcrypto' आणि 'Coinpedia' च्या २०२६ च्या अहवालानुसार, हा आकडा ६ लाख ते ६.६ लाख बिटकॉइन असू शकतो. जर हा दावा खरा ठरला, तर व्हेनेझुएला हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बिटकॉइन धारक ठरेल.
निर्बंधांनंतर सोन्याच्या बदल्यात 'डिजिटल संपत्ती'
२०१८ पासून अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर व्हेनेझुएलाने आपला मार्ग बदलला. अहवालानुसार, वेनेझुएलाने आपल्या खाणींमधून काढलेले सुमारे २ अब्ज डॉलरचे सोने ५,००० डॉलर प्रति बिटकॉइन या दराने विकून ४ लाख बिटकॉइन जमा केल्याचे म्हटले जाते. तेलाच्या निर्यातीचे पैसे डॉलरऐवजी 'यूएसडीटी'मध्ये घेतले गेले आणि नंतर त्याचे रुपांतर बिटकॉइनमध्ये करण्यात आले, जेणेकरून अमेरिकेला ही मालमत्ता 'फ्रीज' करणे कठीण जावे.
सोन्यापेक्षा बिटकॉइनला पसंती का?
व्हेनेझुएलामध्ये महागाईने हजारो टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवस्थेतून कट झाल्यामुळे डॉलरची खाती कधीही गोठवली जाऊ शकतात, हे मादुरो यांना ठाऊक होते. सोन्याची वाहतूक करणे धोक्याचे आणि खर्चिक असते, तर बिटकॉइन हे 'डिसेंट्रलाइज्ड' असून ते जगात कोठेही पाठवणे सोपे आणि ट्रॅक करणे कठीण असते.
ट्रम्प यांची नजर 'स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह'वर?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्च २०२५ मध्ये 'स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह' तयार करण्याची घोषणा केली होती. सध्या अमेरिकेकडे गुन्हेगारी तपासात जप्त केलेले सुमारे २ लाख बिटकॉइन आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेलापेक्षा तिथल्या बिटकॉइन खजिन्यात जास्त रस असू शकतो. जर हा खजिना जप्त झाला, तर तो थेट अमेरिकेच्या रिझर्व्हमध्ये जोडला जाईल, ज्यामुळे अमेरिकन करदात्यांवर बोजा न पडता देशाची डिजिटल मालमत्ता वाढेल.
वाचा - केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
बाजारावर काय परिणाम होईल?
जर व्हेनेझुएलाचा हा मोठा साठा जप्त होऊन 'लॉक' झाला, तर बाजारातील बिटकॉइनचा पुरवठा कमी होईल. यामुळे किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. "अमेरिका आता व्हेनेझुएलाला रन करेल," या ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ तिथल्या आर्थिक आणि डिजिटल मालमत्तेवर नियंत्रण मिळवणे असाच असल्याचे विश्लेषक मानत आहेत.
