लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांवर आता अमेरिकेचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा सकारात्मक परिणाम भारतावर होणार असून, भारताचे तिथे अडकलेले १ अब्ज डॉलर (सुमारे ८,४०० कोटी रुपये) परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक कच्चे तेल साठा असलेला देश आहे. मात्र, अमेरिकन निर्बंधांमुळे भारताचा तिथून होणारा व्यापार गेल्या काही वर्षांत निम्म्यावर आला होता. भारताची सरकारी क्षेत्रातील कंपनी ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ व्हेनेझुएलातील तेल प्रकल्पात ४० टक्के भागीदार आहे. मात्र, निर्बंधांमुळे २०१४ पासून भारताचा लाभांश आणि इतर देणी मिळणे बंद झाले होते. ही थकबाकी आता १ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे.
व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन का घसरले?
एकेकाळी ३५ लाख बॅरल प्रति दिवस इतके व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन होते. मात्र, २०२६च्या सुरुवातीला ते फक्त ८-१० लाख बॅरल प्रति दिवसवर आले आहे.
भारताला होणारे ३ मोठे फायदे
अडकलेला पैसा परत मिळणार : विश्लेषकांच्या मते, व्हेनेझुएलातील तेल क्षेत्राचे पुनर्गठन झाल्यास भारताची थकीत देणी प्राधान्याने दिली जातील.
तेल उत्पादनात १० पटीने वाढ : सध्या ओएनजीसी तिथे दिवसाला फक्त ५ ते १० हजार बॅरल तेल काढते. अमेरिकेने निर्बंध शिथिल केल्यास आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे उत्पादन १ लाख बॅरलपर्यंत नेणे शक्य आहे.
भारताला फायदा : भारतीय कंपन्यांकडे व्हेनेझुएलातील ‘जड कच्चे तेल’ शुद्ध करण्याची प्रगत यंत्रणा आहे. तिथून स्वस्त तेल मिळाल्यास भारताचा आयात खर्च कमी होईल.
व्यापारावर परिणाम नाही, पण संधी
‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या अहवालानुसार, सध्या भारत - व्हेनेझुएला व्यापार खूपच कमी (२.५५ अब्ज डॉलर) आहे. त्यामुळे या राजकीय अस्थिरतेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, भविष्यात अमेरिकेच्या देखरेखीखाली तेल उत्पादन सुरू झाल्यास भारताची उर्जा सुरक्षा अधिक भक्कम होईल.
