Silver Price: अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं जोरदार नफा कमावला आहे. चांदीमुळे कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कर भरल्यानंतर हिंदुस्तान झिंकचा एकत्रित नफा २६४९ कोटी रुपये राहिला आहे. तिमाही आधारावर कंपनीचा नफा १९ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या एकूण नफ्यात एकट्या चांदीचा हिस्सा ४० टक्के राहिलाय, जो सुमारे १०६० कोटी रुपये आहे. ही माहिती 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आलीये.
टॉप-५ चांदी उत्पादकांमध्ये हिंदुस्तान झिंक
हिंदुस्तान झिंक लिमिटेड, जगातील टॉप-५ चांदी उत्पादकांपैकी एक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत हिंदुस्तान झिंकनं १७०६ कोटी रुपयांचं चांदीचं उत्पन्न मिळवलं. तिमाही आधारावर कंपनीच्या चांदीच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी आणि वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात चांदीच्या किमती वाढल्यामुळे कंपनीला हा चांदीचा 'बोनान्झा' मिळाला आहे आणि कंपनीने मजबूत कामगिरी दर्शवली आहे. शिसे आणि जस्त यांच्या धातूंसोबत चांदी नैसर्गिकरित्या आढळते, याचे खनन आणि शुद्धीकरण हिंदुस्तान झिंक लिमिटेड करते. कंपनीच्या कमाईमध्ये याचा वाटा वाढत आहे.
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
दुसऱ्या तिमाहीत सर्वाधिक उत्पन्न
हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न मिळवलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ८,५४९ कोटी रुपये राहिलं आहे, जे तिमाही आधारावर १० टक्क्यांनी जास्त आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा इबिट्डा मार्जिन ५२ टक्के राहिलाय. कंपनीनं टेक अपग्रेड्स आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमुळे ५ वर्षांतील सर्वात कमी झिंक उत्पादन खर्च गाठला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत चांदीमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. ईटीएफनं आधीच लोकांचे पैसे दुप्पट केलेत. फ्युचर मार्केटमध्ये चांदीच्या किमतीत सुमारे ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.