नवी दिल्ली - भारतातील दिग्गज उद्योगपती वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं वयाच्या ४९ व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले. अमेरिकेत स्कीइंग करत असताना झालेल्या अपघातानंतर अग्निवेश यांना न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची तब्येत सुधारत असल्याची अपेक्षा होती परंतु अचानक हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांचा जीव गेला. अग्निवेश अग्रवाल यांचं निधनाने उद्योग जगतात शोक व्यक्त केला जात आहे.
अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टमध्ये हा दिवस त्यांच्या जीवनाचा “सगळ्यात अंधारमय दिवस” असल्याचं म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असेही लिहिलं की, मुलाने आपल्या वडिलांसमोर असे जग सोडून जाऊ नये. माहितीनुसार, अग्निवेश एका मित्रासोबत अमेरिकेत स्कीइंगला गेला होता. तिथे त्यांचा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी न्यू यॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबाला आशा होती की सर्व काही ठीक होईल. पण त्यानंतर अग्निवेश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
४९ वर्षीय अग्निवेश अग्रवाल हे वेदांत ग्रुपची कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या संचालक मंडळावर होते. अनिल अग्रवाल यांना दोन मुले होती त्यातील एक दिवंगत मुलगा अग्निवेश आणि मुलगी प्रिया. प्रिया वेदांताच्या संचालक मंडळावर आहेत आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म ३ जून १९७६ रोजी पटना येथे झाला. त्यांनी अजमेर येथील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांना बॉक्सिंग आणि घोडेस्वारीची आवड होती. त्यांनी फुजेराह गोल्ड कंपनीची स्थापना केली आणि हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणून काम केले.
"मी अग्निवेश यांना वचन दिले होते की आम्हाला वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्यातील ७५% पेक्षा जास्त आम्ही सामाजिक कार्यासाठी समर्पित करू. आज, मी त्या वचनाचा पुनरुच्चार करतो. मी आता अधिक साधे जीवन जगेन आणि माझे उर्वरित आयुष्य मी यासाठी समर्पित करेन. "मला समजत नाही की मी तुझ्याशिवाय कसे जगेन, बेटा. तुझ्याशिवाय आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील, परंतु मी तुझी स्वप्ने कधीही अपूर्ण राहू देणार नाही आपल्या मुलाच्या मृत्यूची घोषणा करताना अनिल अग्रवाल यांनी लिहिले.
