UTS App News: दररोजच्या रेल्वे प्रवासासाठी तिकीट बुकिंगसाठी वापरलं जाणारं रेल्वेचं 'UTS' ॲप १ मार्चपासून बंद होणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी जारी केलेल्या मेसेजमध्ये, यापुढे केवळ 'RailOne' हे ॲपच तिकीट बुकिंग आणि प्रवासी सेवांसाठी एकमेव, एकात्मिक आणि अधिकृत मोबाईल प्लॅटफॉर्म असेल असं म्हटलंय. प्रवाशांच्या सेवांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्यांनी लवकरात लवकर 'RailOne' ॲपवर शिफ्ट व्हावं, असं आवाहन रेल्वेनं केलंय.
R-Wallet रिचार्ज आणि शिल्लक रकमेची स्थिती
UTS ॲपचं नवीन व्हर्जन डाउनलोड किंवा अपडेट करणाऱ्या युजर्सना आता प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येणार नाही किंवा R-Wallet रिचार्ज करता येणार नाही. मात्र, रेल्वेनं स्पष्ट केले आहे की, UTS ॲपमधील प्रवाशांची R-Wallet शिल्लक पूर्णपणे सुरक्षित राहील. ही रक्कम कुठेही जाणार नाही किंवा संपणार नाही, तर ती RailOne ॲपवर सहजपणे वापरता येईल.
RailOne ॲपची वैशिष्ट्ये आणि सुविधा
नवीन RailOne ॲपमध्ये प्रवाशांना सर्व प्रकारची तिकिटे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील, ज्यामध्ये आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटांचा समावेश आहे. सुरक्षित पेमेंटसाठी युपीआय (UPI), डेबिट/क्रेडिट कार्ड, आर-वॉलेट आणि नेट बँकिंगचे पर्याय देण्यात आलेत. याव्यतिरिक्त, प्रवाशांना ट्रेनची लाईव्ह स्थिती, विलंब, कोचची स्थिती आणि प्लॅटफॉर्मची माहिती मिळवता येईल. पीएनआर स्टेटस तपासणं, तिकीट रद्द करणं आणि रिफंडचा मागोवा घेणं ही कामंही सोपी होतील. तसंच, आयआरसीटीसी मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून जागेवर जेवण मागवण्याची आणि रेलमदतद्वारे तक्रारी नोंदवण्याची सोयही यात करण्यात आली आहे.
UTS मोबाईल ॲपचा आतापर्यंतचा प्रवास
UTS मोबाईल तिकिटिंग प्रणालीची सुरुवात २७ डिसेंबर २०१४ रोजी झाली होती. सुरक्षा आणि ग्राहक अनुभवाच्या विविध चाचण्यांनंतर ही प्रणाली सर्वप्रथम मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये लागू करण्यात आली. त्यानंतर २०१५ ते २०१७ दरम्यान चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि सिकंदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये याचा विस्तार झाला. १ नोव्हेंबर २०१८ पासून ही सुविधा इंटर-झोनल प्रवासासाठीही उपलब्ध झाली, ज्यामुळे प्रवाशांना संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कमधील कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान मोबाईलद्वारे तिकीट काढणं शक्य झालं.
