नवी दिल्ली - मध्य पूर्वेतील तणावात अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्धाचा परिणाम आता भारतीय रिअल इस्टेटवर जाणवू लागला आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशातील टॉप ७ शहरांमध्ये घरांची विक्री घटली आहे. एनारॉकच्या ताज्या रिपोर्टनुसार, मागील तिमाहीच्या तुलनेत यावर्षी विक्रीत ७ टक्क्यांनी घट झाली आहे. ज्यामुळे विकासक आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीत या ७ प्रमुख शहरांमध्ये जवळपास १.५१ लाख कोटी किंमतीचे १ लाख १ हजार ६७५ घरे विक्री झाली. २०२५ च्या अखेरच्या तिमाहीत १.६० लाख कोटी किंमतीचे १ लाख ८ हजार ९७० घरे विकली गेली होती. जर शहरांची आकडेवारी पाहिली तर या तिमाहीत एकूण विक्रीच्या ४८ टक्के वाटा एकट्या मुंबई आणि बंगळुरूमधून पुढे आला आहे.
मुंबईत सर्वात अधिक ३२ हजार ८०० घरांची विक्री झाली आहे. जी २०२५ च्या अखेरच्या तिमाहीत ३४ हजार ७२५ घरांच्या विक्री तुलनेत ६ टक्क्यांनी कमी आहे. याचप्रकारे बंगळुरूत घरांची विक्री ५ टक्क्यांनी घटली आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत १६ हजार ४४० घरे विकली गेली तर मागील तिमाहीत हा आकडा १७ हजार २५० इतका होता. पुण्यातही घरांच्या विक्रीत १० टक्क्यांनी घट झाली आहे. याठिकाणी १५ हजार ३०० घरे विकली गेली, मागील तिमाहीत हा आकडा १७ हजारांपर्यंत होता.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये विक्रीत घट
दरम्यान, राजधानी दिल्ली एनसीआर भागातही घरांच्या विक्रीत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. याठिकाणी २०२५ च्या अखेरच्या तिमाहीत १६ हजार ५२५ घरांची विक्री झाली होती. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा १५ हजार १९० युनिट्सवर पोहचला आहे. हैदराबाद येथे विक्री स्थिरता आहे. इथे २०२६ च्या पहिल्या तिमाहीत १२ हजार ४२५ घरांची विक्री झाली, जी मागील तिमाहीत १२ हजार ४३५ इतकी होती. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत चेन्नईमध्ये जवळपास ५ हजार ३१० घरांची विक्री झाली. २०२५ च्या शेवटच्या तिमाहीत इथं ६ हजार ४६० घरे विकली गेली होती. याच कालावधीत कोलकाता येथे घरांची विक्री ८ टक्क्यांनी घटली.
