Stock Market crashed : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी अचानक खीळ बसली. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि नफा वसुलीच्या लाटेमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांपेक्षा अधिक गडगडला, तर निफ्टीने २५,५६७ चा नीचांकी स्तर गाठला. या एकाच दिवसाच्या धक्क्यामुळे गुंतवणूकदारांची सुमारे ४ लाख कोटी रुपयांची मालमत्ता अक्षरशः पाण्यात गेली आहे.
बाजारातील घसरणीची ५ मुख्य कारणे
बाजारातील विश्लेषकांच्या मते, आजच्या या मोठ्या घसरणीमागे खालील पाच घटक कारणीभूत ठरले आहेत.
१. नफा वसुलीचा सपाटा : गेल्या तीन दिवसांपासून बाजार सातत्याने वधारत होता. बजेट, भारत-अमेरिका करार आणि आरबीआयच्या पतधोरणानंतर आता बाजाराकडे कोणतेही मोठे 'डोमेस्टिक ट्रिगर' शिल्लक नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले नफा सुरक्षित करण्यासाठी शेअर्स विकण्यावर भर दिला.
२. अमेरिकन फेडचा पेच : अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या जानेवारीतील बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यातून असे दिसून आले की अधिकारी व्याजदराबाबत विभागले गेले आहेत. काहींना व्याजदर कपातीची घाई नको आहे. यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम परदेशी गुंतवणुकीवर होण्याची भीती आहे.
३. अमेरिका-इराण तणाव : भू-राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकन लष्कर इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. विकेंडला तणाव वाढू शकतो, या भीतीने गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत पैसे काढून घेतले.
४. कच्च्या तेलाचा भडका : ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय तेलाच्या किमतीत झालेली वाढ भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने तेलाच्या किमती वाढल्यास भारतीय रुपयावर दबाव येतो आणि महागाई वाढण्याची शक्यता असते.
५. नव्या सकारात्मक बातम्यांचा अभाव : बाजार सध्या 'हाय व्हॅल्यूएशन'वर आहे, विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जास्त जोखीम दिसत आहे. नवीन कोणतीही मोठी सकारात्मक बातमी नसल्यामुळे बाजार एका ठराविक मर्यादेत राहून घसरणीचा कल दाखवत आहे.
आकडेवारीतील पडझड
मार्केट कॅप : बीएसईवरील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल ४७२ लाख कोटींवरून थेट ४६८ लाख कोटींवर खाली आले.
इंडेक्स : सेन्सेक्स १ टक्क्यांहून अधिक तर निफ्टी ०.९ टक्क्यांनी घसरला.
वाचा - ८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
