भारताला अतिशय सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रशियन कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आता मोठे संकट आले आहे. रशियातील प्रमुख तेल निर्यातदार कंपन्यांवर अमेरिकेने नुकतेच नवीन आणि कठोर निर्बंध लादल्यामुळे, भविष्यात भारताचीरशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे देशाच्या तेल बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युरोपातील घटलेली मागणी आणि पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून रशिया भारताला अत्यंत स्वस्त दरात कच्चा तेल पुरवत होता. याच कारणामुळे भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा १ टक्क्यावरून वाढून जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. नोव्हेंबर महिन्यातही रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश ठरला होता.
रशियन कंपन्यांवर थेट बॅन
अमेरिकेने रशियन कच्चे तेल निर्यात करणाऱ्या रॉसनेफ्ट आणि लुकोइल तसेच त्यांच्या बहुसंख्य उपकंपन्यांवर २१ नोव्हेंबरपासून हे नवीन निर्बंध पूर्णपणे लागू केले आहेत. याचा अर्थ, या कंपन्यांकडून कच्चे तेल खरेदी करणे किंवा विकणे जवळपास अशक्य झाले आहे. या निर्बंधांमुळे भारतीय रिफायनरीज कंपन्यांची चिंता वाढली आहे. केप्लरचे मुख्य संशोधन विश्लेषक सुमित रितोलिया यांनी सांगितले की, "विशेषतः डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भारताला होणाऱ्या रशियन तेलाच्या प्रवाहामध्ये मोठी घट अपेक्षित आहे."
आयात थेट ४ लाख बॅरलवर येणार?
निर्बंध लागू होण्यापूर्वीही भारत रशियाकडून दररोज सरासरी १७ लाख बॅरल तेलाची आयात करत होता. नोव्हेंबरमध्ये तर ही आयात १८ ते १९ लाख बॅरल प्रतिदिन राहण्याचा अंदाज आहे. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आता ही आयात कमी होऊन दररोज सुमारे ४ लाख बॅरलपर्यंत खाली येण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल-मित्तल एनर्जी आणि मॅंगलोर रिफायनरी यांसारख्या कंपन्यांनी सध्या रशियन तेलाची आयात थांबवली आहे. केवळ रॉसनेफ्ट समर्थित नायरा एनर्जी ही एकच कंपनी रशियन तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
स्वस्त तेलामुळे देशात दर स्थिर
विशेषज्ञ सांगतात की, मागील दोन वर्षांत मिळालेल्या स्वस्त रशियन तेलामुळे भारतीय रिफायनर्सना मोठा नफा कमावता आला. याच नफ्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर अस्थिर असतानाही देशातील पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर स्थिर ठेवता आले.
भारताला आपल्या एकूण तेल गरजेपैकी ८८ टक्के तेल आयात करावे लागते. त्यामुळे रशियन तेलाच्या पुरवठ्यात होणारी ही संभाव्य घट भारताच्या ऊर्जा बाजारासाठी अस्थिर आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण करणारी ठरू शकते. रशियन तेल पूर्णपणे थांबणार नाही, पण पुरवठा नक्कीच कमी होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
