UPI Payment New Rule: यूपीआय पेमेंटमुळे आपलं आयुष्य किती सोपं झालं आहे, हे सर्वांना माहीत आहे. एका क्लिकमध्ये हजारो रुपयांचे व्यवहार सेकंदांमध्ये होतात. रोख पैसे सोबत ठेवण्याची चिंता संपली आणि मित्र-नातेवाईकांकडून पैसे मागणंही सोपं झालं.
परंतु आता एक मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) यूपीआयची पर्सन-टू-पर्सन (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, १ ऑक्टोबर २०२५ पासून तुम्ही फोनपे, जीपे किंवा कोणत्याही यूपीआय ॲपवर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा इतरांना थेट पैसे मागण्याची रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.
दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
कलेक्ट रिक्वेस्ट किंवा पुल ट्रान्झॅक्शन काय आहे?
समजा, तुम्हाला तुमच्या मित्राकडून १००० रुपये हवे आहेत. आतापर्यंत तुम्ही ॲपवर त्याची यूपीआय आयडी टाकून रिक्वेस्ट पाठवत होता. तो स्वीकारायचा, पिन टाकायचा आणि पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायचे. पण आता ही सुविधा सामान्य लोकांसाठी बंद होत आहे. NPCI नं बँका आणि पेमेंट ॲप्सला स्पष्टपणे १ ऑक्टोबरपासून हे फीचर काढण्यास सांगितलं आहे. यामागचा उद्देश ऑनलाईन पेमेंट आणखी सुरक्षित करणं आहे. कारण, काही फसवणूक करणारे या फीचरचा गैरफायदा घेऊन लोकांकडून पैसे उकळत होते.
मर्चंट्ससाठी सुविधा कायम
तरीही, मर्चंट्ससाठी ही सुविधा कायम राहील. म्हणजेच, तुम्ही IRCTC वरून तिकीट बुक केल्यास, फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर शॉपिंग केल्यास, किंवा नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेतल्यास, हे मर्चंट्स तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकतील. पण तुम्ही तुमच्या मित्राला रेस्टॉरंटचं बिल शेअर करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. NPCI नं यापूर्वीही सुरक्षेसाठी पाऊलं उचलली होती, जसं की कलेक्ट रिक्वेस्टची मर्यादा २००० रुपयांपर्यंत मर्यादित करणं. आता ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे फीचर आधी कशासाठी आणलं होतं?
याचा उद्देश देवाण-घेवाण सोपं करणं हा होता. जसं की, मित्रांकडून उसने घेतलेले पैसे आठवण करून देणं किंवा ऑनलाईन शॉपिंगचं पेमेंट जलद करणं. पण फसवणूक करणाऱ्यांनी याचा गैरवापर सुरू केला. बनावट रिक्वेस्ट पाठवून लोकांची फसवणूक केली जाऊ लागली. त्यामुळेच NPCI नं कठोर पाऊल उचललं आहे.
या बदलामुळे दैनंदिन व्यवहार थोडे कठीण होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही मित्रांसोबत डिनरचं बिल वाटत असाल, तर आता रिक्वेस्ट पाठवण्याऐवजी त्यांना स्वतः पेमेंट करायला सांगावं लागेल. पण चांगली गोष्ट अशी आहे की यामुळे फसवणूक कमी होईल. जर तुम्ही यूपीआय वापरत असाल, तर सावधान रहा. बनावट रिक्वेस्टपासून वाचण्यासाठी पेमेंट कोणाला जात आहे, हे नेहमी तपासा. एकूणच, NPCI चं हे पाऊल तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.