Union Budget 2026 Date: दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु यावेळी १ फेब्रुवारी रोजी रविवार असल्यानं अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी रविवारी सादर केला जाणार की सोमवारी याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. परंतु आता यावर पूर्णविराम लागला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी वर्ष २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प रविवारी सादर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज कॅबिनेट समितीनं (CCPA) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती २८ जानेवारी रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील, ज्यातून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. २९ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey) सादर केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत असेल. 'न्यूज १८' नं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील, जो स्वातंत्र्यानंतरचा ८८ वा अर्थसंकल्प असेल. २०१७ पासून सरकार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याच्या परंपरेचं पालन करत आहे. पूर्वी अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी सादर करण्याची परंपरा होती. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात हा बदल करण्यात आला होता, जेणेकरून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अर्थसंकल्पीय प्रस्तावांची लवकर अंमलबजावणी करता येईल. दरम्यान, आठवड्याच्या शेवटी (शनिवार-रविवार) अर्थसंकल्प सादर करणे ही काही नवीन गोष्ट नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला होता आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५ आणि २०१६ चे अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी सादर केले होते, त्या दोन्ही दिवशी शनिवार होता.
सीतारामन रचणार इतिहास
निर्मला सीतारामन सलग नऊ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री बनून इतिहास रचतील. यामुळे भारतातील सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये त्यांचं स्थान अधिक मजबूत होईल. त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचतील, ज्यांनी दोन टप्प्यात एकूण १० अर्थसंकल्प सादर केले होते. त्यांनी १९५९ ते १९६४ दरम्यान सहा आणि १९६७ ते १९६९ दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले होते.
इतर अलीकडील अर्थमंत्र्यांमध्ये पी. चिदंबरम यांनी नऊ अर्थसंकल्प सादर केले होते, तर प्रणव मुखर्जी यांनी विविध पंतप्रधानांच्या हाताखाली आपापल्या कार्यकाळात आठ अर्थसंकल्प सादर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर आले तेव्हा २०१९ मध्ये निर्मला सीतारामन भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. २०२४ मध्ये मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा जिंकल्यानंतरही त्यांनी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली.
तयारी आधीपासूनच सुरू
अर्थसंकल्पाची तयारी आधीपासूनच सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होईल. राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करतील. हे अभिभाषण सरकारच्या धोरणांची आणि आगामी योजनांची रूपरेषा सांगते. यानंतर आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. आर्थिक पाहणी अहवाल देशाच्या आर्थिक स्थितीचं सविस्तर विश्लेषण सादर करतो. अर्थव्यवस्था कशी चालली आहे आणि भविष्यात काय अपेक्षा आहेत, हे त्यातून स्पष्ट होते.
