Gold Jewelry Making Charges : सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांच्या किमतीत सोन्याच्या दराव्यतिरिक्त सराफाचा नफा कुठे दडलेला असतो? सोन्याच्या प्रत्येक ग्रॅममागे सराफ किती कमाई करतात? वाढत्या दरांचा फटका कोणाला बसतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊ.
घडणावळ : नफ्याचा मुख्य स्रोत
सोनार किंवा सराफाच्या नफ्याचा सर्वात मोठा आणि थेट स्रोत म्हणजे 'मेकिंग चार्जेस' (घडणावळ). हे शुल्क सोन्याच्या शुद्ध बिस्किटाच्या किमतीवर लावले जाते. दागिने तयार करणाऱ्या कारागिरांची मेहनत, कौशल्य, डिझाइन, पॉलिश आणि फिनिशिंग यासाठी हे शुल्क आकारले जाते. साधारणपणे दागिन्यांच्या एकूण मूल्याच्या ५% ते २५% पर्यंत मेकिंग चार्जेस असू शकतात. साधी चैन किंवा अंगठी असेल तर घडणावळ कमी असते. मात्र, नक्षीकाम केलेले प्राचीन हार किंवा बांगड्या असतील, तर हे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढते. डिझाइन जेवढे क्लिष्ट, तेवढे शुल्क जास्त!
'स्प्रेड' आणि छुप्या नफ्याचे गणित
मेकिंग चार्जेसव्यतिरिक्त सराफ 'स्प्रेड' मधूनही कमाई करतात. सराफ ज्या दराने जुने सोने विकत घेतात आणि ज्या दराने नवीन सोने विकतात, यामध्ये थोडा फरक असतो. समजा १ एप्रिल २०२६ रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे १४,००० रुपये आहे. सर्व मेकिंग चार्जेस आणि मार्जिन मिळून, एक सराफ १ ग्रॅम सोन्याच्या विक्रीमागे सुमारे ८०० ते १,५०० रुपयांपर्यंत नफा कमवू शकतो.
निव्वळ नफा की खर्च?
प्रति ग्रॅम १,५०० रुपयांचा नफा मोठा वाटत असला, तरी तो सराफाचा 'निव्वळ नफा' नसतो. यामधून त्यांना खालील खर्च करावे लागतात.
- भव्य शोरूमचे भाडे आणि वीज बिल.
- कर्मचाऱ्यांचे पगार आणि सुरक्षा खर्च.
- जीएसटी आणि इतर सरकारी कर.
- हे सर्व खर्च वजा केल्यानंतर उरलेली रक्कम हा त्यांचा वास्तविक नफा असतो.
वाचा - सोनं-चांदी स्वस्त! ट्रम्प यांच्या एका विधानाने कमोडिटी बाजारात मोठी पडझड; चांदीच्या दरात ४.४% ची घट
सोन्याच्या 'तेजी'मुळे कारागीर 'बेरोजगार'
सोन्याच्या किमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीचा सर्वात मोठा फटका या क्षेत्रातील मुख्य कणा असलेल्या 'घडणावळ कारागिरांना' बसला आहे.
- विक्रीत घट: किमती वाढल्यामुळे सामान्य ग्राहकांनी सोने खरेदीत मोठी कपात केली आहे.
- मुंबईच्या बाजारात मंदी: देशातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असलेल्या मुंबईतील झवेरी बाजारातील कारागिरांच्या उत्पन्नात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
- स्थलांतर : काम नसल्यामुळे अनेक कारागीर बेरोजगार झाले असून, शहरात उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने ते आपल्या मूळ गावी परतत आहेत.
