UltraTech Cement : कोणतीही कंपनी भांडवल उभं करण्यासाठी शेअर बाजारात आपली नोंदणी करते. अशा परिस्थितीत शेअरचा भाव वाढल्यास नफा कमवण्यासाठी यातील काही शेअर्सची ते विक्री करतात. मात्र, देशातील एक उद्योजक आपल्याच कंपनीचे समभाग स्वस्तात विकत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या कुमार मंगलम बिर्ला यांच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. अल्ट्राटेक सिमेंट आता इंडिया सिमेंट्समधील आपले काही शेअर्स विकणार आहे. ही विक्री ७४० कोटी रुपयांची असून, कंपनी सेबीच्या नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेत आहे.
सेबीचा नियम आणि कारण
भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये किमान २५% शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांकडे असणे बंधनकारक आहे. सध्या देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी असलेल्या अल्ट्राटेककडे इंडिया सिमेंट्सचे ८१.५% शेअर्स आहेत. हे प्रमाण कमी करून ७५% वर आणण्यासाठी, अल्ट्राटेकला ६.५% शेअर्सची विक्री करावी लागणार आहे. हे शेअर्स आज, गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी विकले जातील.
विक्रीचा दर आणि बाजारपेठेतील कामगिरी
इंडिया सिमेंट्सच्या शेअरचा विक्री दर प्रति शेअर ३६८ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो बुधवारच्या बंद भावापेक्षा किंचित कमी आहे. बुधवारच्या सत्रात इंडिया सिमेंट्सचा शेअर ३७० रुपयांवर बंद झाला होता. या बातमीनंतर, गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात इंडिया सिमेंट्सच्या शेअरमध्ये सुमारे ४% वाढ झाली आणि तो ३८४.७५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये मात्र ०.१२% ची किरकोळ घसरण दिसून आली. त्यानंतर १२८५५.७५ रुपयांवर आला.
वाचा - ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
अधिग्रहणाचा इतिहास आणि पुढील पाऊल
गेल्या वर्षी अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंट्सचे अधिग्रहण केले होते. जून २०२४ मध्ये, कुमार मंगलम बिर्ला यांनी राधाकिशन दमानी यांच्याकडून २४% आणि नंतर एन. श्रीनिवासन यांच्याकडून ३२.८% शेअर्स खरेदी केले. त्यानंतर त्यांनी २६% शेअर्ससाठी ओपन ऑफर दिली. सेबीच्या नियमांनुसार, इंडिया सिमेंट्सला ३ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे प्रमाण २५% पर्यंत आणायचे आहे आणि ही विक्री त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.