Bengaluru Uber Drivers Protest : बेंगळूरुमध्ये सोमवारी उबर ड्रायव्हर सेंटरबाहेर शेकडो टॅक्सी चालकांनी जोरदार गोंधळ घातला. संतप्त चालकांनी कंपनीवर गंभीर आरोप करत फ्लीट ड्रायव्हर्स आणि इंडिपेंडेंट ड्रायव्हर्स यांच्यात भेदभाव केला जात असल्याचे म्हटले. या भेदभावामुळे त्यांची कमाई सातत्याने कमी होत असल्याचा दावा चालकांनी केला. परिस्थिती इतकी बिघडली की, चालकांनी बंद दरवाजा तोडून सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
चालकांचे गंभीर आरोप
भारत ट्रान्सपोर्टेशन ग्रुपच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या चालकांनी उबर कंपनीवर थेट आरोप केले. उबर जाणूनबुजून इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने चालक आणत आहे, ज्यामुळे स्थानिक चालकांच्या कमाईवर थेट परिणाम होत आहे. बाहेरून आलेल्या चालकांना जास्त राइड्स आणि उत्तम इन्सेंटिव्ह मिळत असल्याचा, तर जुन्या बेंगळूरुच्या चालकांना जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात असल्याचा चालकांचा दावा आहे. चालकांनी सांगितले की, पूर्वी ते दिवसाला ८,००० ते १०,००० रुपयांपर्यंत कमवत असत, पण आता त्यांना मासिक ४,००० ते ५,००० रुपये कमावणेही कठीण झाले आहे.
हिंसक आंदोलनानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
चालकांनी सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरू केले होते, पण काही वेळातच ते तीव्र आक्रोशात बदलले. गोंधळ जास्त वाढल्यामुळे पोलिसांना तातडीने बोलावण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
वाचा - इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
उबर कंपनीचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर उबर कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले. कंपनीने आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि धमकीचा कठोर शब्दांत निषेध केला. उबरने स्पष्ट केले की, कंपनी फ्लीट ड्रायव्हर्स आणि इंडिपेंडेंट ड्रायव्हर्समध्ये कोणताही भेदभाव करत नाही. कंपनीची धोरणे पूर्णपणे पारदर्शक आहेत आणि प्रत्येक चालकाला समान संधी दिली जाते. कंपनी झिरो कमिशन मॉडेलवर काम करते. चालक स्वतःच संपूर्ण भाडे ठरवतात, फक्त नाममात्र सबस्क्रिप्शन फी द्यावी लागते. कंपनीने म्हटले आहे की, काही लोक जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत आणि हिंसेची मदत घेऊन कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
